'पतंजली'त विदेशी यंत्रे वापरतात, पण... - आचार्य बालकृष्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पुणे - 'आजही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या केवळ विदेशातच बनतात. भारतात त्या बनविण्याचे तंत्रज्ञान अद्याप विकसितच झालेले नाही. मात्र याचा अर्थ आपण विदेशी गोष्टींचा पुरस्कार करावा, असा नव्हे! "पतंजली'च्या कारखान्यांत आम्हीही अनेक विदेशी बनावटीची यंत्रे वापरतो. मात्र त्याचा उपयोग आम्ही "स्वदेशी' वस्तूंचे निर्माण आणि पुरस्कारासाठी करतो. आमच्याकडील ज्यूसर विदेशी असेल, पण ज्यूस मात्र अस्सल स्वदेशीच असतो...'' अशा शब्दांत "पतंजली आयुर्वेद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी "स्वदेशी'चा नारा दिला.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक स्मारक ट्रस्टतर्फे बालकृष्ण यांना यंदाचा "लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक' मंगळवारी प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. दीपक टिळक उपस्थित होते.

बालकृष्ण म्हणाले, 'एकेकाळी या देशात एकच "ईस्ट इंडिया कंपनी' राज्य करत होती. आज हजारोंनी विदेशी कंपन्या आपल्या देशाला आर्थिक गुलाम बनवत चारही दिशांनी आक्रमण करू पाहताहेत. या सगळ्या आधुनिक "ईस्ट इंडिया कंपनी'च आहेत. या आक्रमणामुळे आपली संस्कृती विकली जात आहे. साबण विकायचा म्हटला तरी आपल्या माता-भगिनींचे चेहरे या कंपन्या जाहिरातींसाठी वापरतात. हे कधीपर्यंत खपवून घ्यायचे?... त्यांच्यासाठी भारत एक "बाजार' असेल, आमच्यासाठी मात्र ते एक कुटुंब आहे! म्हणून आजच स्वतःला वचन द्या, की आपण कधीही विदेशी वस्तू वापरणार नाही.''