‘अपयशातून यशाकडे’ शैक्षणिक मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

‘सकाळ सोशल फाउंडेशन’तर्फे उद्या आयोजन; व्यावसायिक कौशल्य विकासाबाबत माहिती

पुणे - ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने दहावी बारावीतील कमी गुण मिळालेल्या किंवा नापास विद्यार्थ्यांसाठी ‘अपयशाकडून-यशाकडे’ हा मोफत शैक्षणिक मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

‘सकाळ सोशल फाउंडेशन’तर्फे उद्या आयोजन; व्यावसायिक कौशल्य विकासाबाबत माहिती

पुणे - ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने दहावी बारावीतील कमी गुण मिळालेल्या किंवा नापास विद्यार्थ्यांसाठी ‘अपयशाकडून-यशाकडे’ हा मोफत शैक्षणिक मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

हा उपक्रम येत्या शनिवारी (ता. १७) सकाळी अकरा वाजता बुधवार पेठेतील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयातील सभागृहात होणार आहे. त्यात दहावी, बारावीनंतरच्या संधी, व्यावसायिक कौशल्य विकास आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विद्यार्थी आणि पालकांना माहिती देण्यात येईल. संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमात ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे सहायक सचिव अनिल गुंजाळ उपयुक्त उपक्रम आणि शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शन करतील. भारतीय जैन संघटनेच्या पिंपरी येथील महाविद्यालयातील प्रा. दीपक बिचे विविध संधींची माहिती देतील. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या प्रा. तनुजा खेर आत्मविश्‍वास वाढविण्यासंबंधी माहिती देतील. 

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दहावी बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांत निर्माण होणाऱ्या न्यूनगंडातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येतो. कमी गुण मिळाले किंवा नापास झाले तरी शिक्षण पुढे चालू ठेवून यशाकडे वाटचाल करता येते, त्याचप्रमाणे विविध कौशल्यांचे शिक्षण घेऊन आत्मविश्‍वास वाढविता येतो हे अशा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. या वेळी विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसनही तज्ज्ञांकडून करून घेता येईल. 

अधिक माहितीसाठी ८६०५०१७३६६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.