विद्यार्थ्यांच्या मनात "खुशी और गम' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - आपल्या अभिनयातून अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर स्वतंत्र ठसा उमटला आहे. अभिनयात ते "बाप' माणूसच आहेत, यात काही शंका नाही; पण गेल्या काही वर्षांतील त्यांची विधाने पाहिली तर त्यांची ओळख "भाजपप्रेमी' बनली आहे. त्यामुळे आमच्या मनात काही शंकाही आहेत... अशी सावध प्रतिक्रिया भारतीय चित्रपट टेलिव्हिजन आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांमधून उमटत आहे. 

"एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड झाल्याचे जाहीर होताच विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरवात केली होती. मात्र खेर यांची निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. खेर हे अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहेत. त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेतला, तर ते ही संस्था उत्तम चालवू शकतील, असा सूर काही विद्यार्थ्यांमधून उमटत आहे; तर काही विद्यार्थी "भाजपप्रेमी' या त्यांच्या नव्या ओळखीबाबत खंतही व्यक्त करत आहेत. 

विद्यार्थी प्रतिनिधी रॉबिन जॉय आणि रोहित कुमार म्हणाले, ""गजेंद्र चौहान यांनी अतिशय सुमार दर्जाचे चित्रपट-मालिका केल्या. त्यामुळे त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही प्रश्‍न उपस्थित केले होते; पण अनुपम खेर यांच्याबाबतीत असे प्रश्‍न विचारता येणार नाही. ते अभिनेते म्हणून मोठेच आहेत. त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. मात्र पुरस्कारवापसी, असहिष्णुता याप्रकरणी खेर यांनी केलेली वक्तव्ये अतिशय टोकाची होती. यावरून ते भाजप प्रवक्तेच वाटतात.'' दरम्यान, संस्थेतील प्राध्यापकांनी या विषयावर बोलणे टाळले. अद्याप अधिकृत माहिती आमच्यापर्यंत आली नाही, असेही प्राध्यापकांनी सांगितले. 

पाच विद्यार्थी बडतर्फ 
"एफटीआयआय'मधील "आर्ट ऍण्ड डायरेक्‍शन' या विभागाचे पाच विद्यार्थी बुधवारी बडतर्फ करण्यात आले. "डायलॉग' या अभ्यासक्रमाबाबत गेले दोन महिने वाद सुरू होता. त्यामुळे पाच विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या बैठकीला गैरहजर राहिले. यामुळे संस्थेतील वसतिगृह रिकामे करा, अशा शब्दांत संस्थेने या विद्यार्थ्यांना नोटिसा दिल्या. संस्थेच्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.