‘फुक्रे रिटर्न’ चित्रपटामधून कुटुंबाचे निखळ मनोरंजन

‘फुक्रे रिटर्न’ चित्रपटामधून कुटुंबाचे निखळ मनोरंजन

पुणे - प्रत्येकाला आपल्या लहानपणापासूनच्या मित्र-मैत्रिणींबरोबरीच्या आठवणींमध्ये नेण्याचे काम ‘फुक्रे रिटर्न’ चित्रपट करतो. चित्रपटातील ‘हनी’, ‘लाली’, ‘चुचा’, ‘भोली पंजाबन’ आदी पात्रांनी तर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. केवळ युवावर्गासाठीच नाही, तर संपूर्ण कुटुंबाला हा चित्रपट निखळ मनोरंजन देत आहे, असे सांगत ‘चित्रपटाने पहिल्याच दिवशी ‘बॉक्‍स ऑफिस’वर उत्पन्नाचे रेकॉर्ड मोडले आहे,’ अशा शब्दांत ‘फुक्रे रिटर्न’ या चित्रपटातील कलाकारांनी आपला आनंद व्यक्त केला.

मृगदीपसिंग लांबा दिग्दर्शित ‘फुक्रे रिटर्न’ चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी त्यातील कलाकार पुलकित सम्राट, रिचा चड्डा, वरुण शर्मा व मनज्योत सिंग यांनी ‘सकाळ’तर्फे भरविण्यात आलेल्या ‘स्कूलिंपिक्‍स’ स्पर्धेसाठी उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. काही खेळाडूंना त्यांच्या हस्ते बक्षीसही देण्यात आले. ‘आयुष्यातील एक भाग म्हणून खेळाकडे पाहा. खेळातूनच पुढचे टप्पेही गाठा; मात्र स्वतःमधील खिलाडूवृत्ती कायम ठेवा’, अशा शब्दांत त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

‘हनी’ची भूमिका साकारणारा पुलकित म्हणाला, ‘‘चित्रपट प्रत्येकाला आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींची आठवण करून देईल. अतिशय हलक्‍या फुलक्‍या विनोदांनी चित्रपट भरलेला आहे. पूर्वीप्रमाणेच याही चित्रपटात सर्वच कलाकारांची ‘केमिस्ट्री’ चांगली जुळली आहे. त्यामुळेच प्रेक्षकांकडून चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’ 

चित्रपटात ‘भोली पंजाबन’ पात्र साकारणारी रिचा म्हणाली, ‘‘प्रत्येक चित्रपटाचा प्रेक्षक ठरलेला असतो. त्याप्रमाणे ‘फुक्रे रिटर्न’चाही प्रेक्षक ठरलेला असून, त्यांनीच चित्रपटाला उचलून धरले आहे. चित्रपटाला मिळणारे यश हा सर्वांच्या ‘टीमवर्क’मुळे आहे. युवावर्गाबरोबरच कुटुंब हा चित्रपट पाहण्यास प्राधान्य देत आहेत.’’

‘चुचा’ची भूमिका पडद्यावर साकारणारा वरुण म्हणाला, ‘‘यापूर्वीच्या चित्रपटातूनच माझे या क्षेत्रात पदार्पण झाले. प्रत्येकामध्ये एक नटखटपणा दडलेला असतो. तो या चित्रपटातून पाहायला मिळेल. या चित्रपटानिमित्त आमची मैत्रीही दृढ झाली.’’

विनोदाची कारंजी उडवत मनज्योतने आपले पात्र उलगडले. तो म्हणाला, ‘‘ ‘फुक्रे’प्रमाणेच ‘फुक्रे रिटर्न’ हा चित्रपटही आहे; मात्र चित्रपटातील काही घटना, प्रसंग व विनोदाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होते. भोली तुरुंगातून माघारी आली असून, आम्हाला त्रास देत आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com