पर्यावरण संवर्धनासाठी गणेश मंडळे सरसावली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

पुणे - पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना गणेश मंडळांनी करावी. तसेच घरोघरीदेखील शाडूच्या मूर्तींचीच स्थापना करावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात येईल. तसेच सामाजिक दृष्टिकोनातून शहराचा विकास आणि समाजाप्रती ऋण व्यक्त करण्याची भावनाही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयात आयोजित बैठकीत बोलून दाखविली.

पुणे - पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना गणेश मंडळांनी करावी. तसेच घरोघरीदेखील शाडूच्या मूर्तींचीच स्थापना करावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात येईल. तसेच सामाजिक दृष्टिकोनातून शहराचा विकास आणि समाजाप्रती ऋण व्यक्त करण्याची भावनाही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयात आयोजित बैठकीत बोलून दाखविली.

सरस्वती मंदिर संस्था ९७ वर्षे जुनी आहे. ही संस्था पुणे व पिंपरी चिंचवड येथे रात्रशाळा चालविते. शाळेतील अनेक विद्यार्थी गरजवंत आहेत. ‘सकाळ’च्या व्यासपीठावरून गणेश मंडळांनी रात्रशाळांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा संकल्प केल्याचे वृत्त वाचून आनंद झाला. ‘सकाळ’च्या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक आहे. 
- प्रा. विनायक आंबेकर, अध्यक्ष, सरस्वती मंदिर संस्था

आमचे मंडळ यंदा शाडूपासून तयार केलेल्या ५२५ गणेशमूर्ती मोफत वाटणार आहोत. पुढच्या वर्षी पाच हजार शाडूच्या मूर्तीचे वाटप करण्याचा संकल्प असून, आतापासून आम्ही या उपक्रमाच्या तयारीला लागलो आहोत. अन्य मंडळांनी देखील शाडूच्या मूर्ती त्यांच्या ऐपतीप्रमाणे मोफत वाटल्यास आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांनाही त्यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना आनंदात करता येईल. विसर्जित मूर्तीची विटंबना होऊ नये. यासाठी देखील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यास आपल्या सर्वांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता येईल.
- शिरीष साळुंखे, अध्यक्ष, शनिपार मित्र मंडळ

शाडूपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आतापासून द्यायला हवे. शाळादेखील या उपक्रमास सहकार्य करतील. गणपती तयार करण्याचा आनंदही घेता येईल. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करता येईल. मंडळातर्फे सामाजिक जाणीव म्हणून अकरा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्चदेखील करणार आहोत.
- युवराज निंबाळकर, अध्यक्ष, छत्रपती राजाराम मंडळ

शहराचे पर्यावरण चांगले राहिल्यास विकासही झपाट्याने होऊ शकतो. त्यामुळे नदी स्वच्छता, वाहतुकीचे नियोजनात मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आम्ही वाढविणार आहोत. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यास बाहेरगावांहून बहुसंख्येने नागरिक येतात. त्यामुळे सहा दिवस पीएमपीच्या बसचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे. मात्र मध्यवर्ती भागात बसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी देखील काळजी घ्यावी.
- गजानन पंडित, उत्सव प्रमुख,नेहरू तरुण मंडळ

गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव, दिवाळी येते. मंडळांच्या कार्यकर्त्यांनीच आकाश कंदील, पणत्या यांसारखे लहान-मोठे व्यवसाय करावेत. त्यातून आपला विकास आपण करू शकू आणि मेक इन इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यास मंडळांचाही हातभार लागेल. आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा रोजगार मिळून समाजाप्रती ऋण व्यक्त करता येईल.
- पुष्कर तुळजापूरकर, कार्याध्यक्ष, नेहरू तरुण मंडळ