कोंढव्यात महिलेवर सामूहिक बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

पुणे - विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. अन्य एक जण फरारी आहे. याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे - विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. अन्य एक जण फरारी आहे. याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

सतीश जयपाल माने (वय 23) आणि बालाजी मारुती शिंदे (31, दोघे रा. सिद्धार्थनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे 2016 मध्ये कोंढवा येथील एका तरुणाशी लग्न झाले; परंतु काही महिन्यांतच त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर ही महिला येरवडा परिसरात आई-वडिलांकडे राहत होती. भावासोबत वाद झाल्यामुळे ती बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घराबाहेर पडली. पतीला भेटण्यासाठी रिक्षाने ती रात्री दहाच्या सुमारास कोंढव्यात पोचली. 

पतीची भेट न झाल्यामुळे ती अकराच्या सुमारास रिक्षाने कोथरूडला जाण्यासाठी निघाली. त्यावेळी रिक्षाचालक माने याने तिला दमदाटी करून सिद्धार्थनगर येथील त्याचा मित्र शिंदे याच्या घरी नेले. तेथे शिंदे याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी रिक्षाचालकाने त्या महिलेला हंडेवाडी येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच रिक्षाचालकाच्या दुसऱ्या मित्राने पीडित महिलेशी छेडछाड करून तिला रिक्षातून कॅम्प परिसरात सोडून दिले. त्यानंतर ही महिला दुसऱ्या रिक्षाने येरवडा येथील मेंटल कॉर्नर येथे रात्री उतरली. शास्त्रीनगर पोलिस चौकीत तिने ही माहिती दिली. तेथील पोलिसांनी हा प्रकार कोंढवा पोलिसांना कळविला. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड आणि त्यांच्या पथकाने दोघांना रात्रीतून अटक केली. पुढील तपास महिला उपनिरीक्षक गोरे करीत आहेत. 

सामूहिक बलात्कारप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. पोलिस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. तपासादरम्यान सर्व माहिती बाहेर येईल. फरारी आरोपीचाही शोध घेण्यात येत आहे. 
- नीलेश मोरे, सहायक पोलिस आयुक्‍त, वानवडी विभाग 

Web Title: pune news Gang rape case