कचरा डेपो नकोच; उरुळी देवाची, फुरसुंगी ग्रामस्थांचा पवित्रा

कचरा डेपो नकोच;  उरुळी देवाची, फुरसुंगी ग्रामस्थांचा पवित्रा

पुणे - महापालिका हद्दीच्या पूर्वेकडील उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे झपाट्याने वाढली आणि अजूनही वाढतच आहेत; पण येथील कचरा डेपोमुळे या दोन्ही गावांतील रहिवासी प्रचंड हैराण झाल्याचे त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर जाणवले. ‘आमची गावे महापालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, तरी आमच्या हद्दीत कचरा डेपो नकोच,’ या भूमिकेवर येथील गावकरी ठाम आहेत. ‘‘कचरा डेपो न हलविल्यास आम्हाला महापालिकेत यायचेच नाही, कचरा डेपो ठेवल्यास गावे महापालिकेत सामावून घेण्याच्या प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेऊ,’’ असा इशाराही गावकऱ्यांनी दिला. दुसरीकडे, गल्ली-बोळांतील बेकायदा बांधकामे आणि अपुरे रस्ते या बाबी गावांच्या विकासातील अडथळा ठरू शकतात, असे या गावांच्या पाहणीत आढळले. 

उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांच्या हद्दीतील सुमारे १६३ एकर जागेत महापालिकेचा कचरा डेपो आहे. ही गावे महापालिकेत येणार असल्याने कचरा डेपो कायम राहण्याची चिन्हे आहे. मात्र, दोन्हीकडील गावकरी महापालिकेत जाण्यापेक्षा कचरा डेपोच नकोच, या भूमिकेवर अडून बसल्याचे स्पष्ट झाले आहे.उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांच्या हद्दीत कचरा डेपो आहे. त्या ठिकाणी रोज सुमारे आठशे टन कचरा टाकला जातो. डेपोमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे. गावातील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. परिणामी, रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात असल्याची तक्रार मांडत, डेपो बंद करण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलनेही केली, त्यावर तात्पुरता तोडगाही काढला जात आहे; मात्र आता ही गावे महापालिकेत घेण्यात येणार असल्याने कचरा डेपो कायम राहण्याची भीती ग्रामस्थांना आहे. त्यामुळे महापालिकेत घेतले नाही तरी चालेल; पण कचरा डेपो नकोच, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याचबरोबरच महापालिकेत गाव घेतल्यास विकास होईल, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. 

आधीच अपुऱ्या सुविधा असल्याने विकासाचा वेग वाढेल का?, असा प्रश्‍न गावात फेरफटका मारल्यानंतर पडला. महापालिकेच्या वतीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होतो; पण तो अपुरा असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. त्यासाठी टॅंकरची संख्या वाढवावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. तर, घरोघरी जमा होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्‍न सोडविला पाहिजे. गावातील कचरा डेपो तातडीने बंद करण्याची मागणी आहे, त्यामुळे दुर्लक्ष केले जात असून, ही बाब गांभीर्याने घ्यावी. रस्ते, वाहतुकीची साधने आणि पाणी या सुविधा भक्कम असाव्यात, ही गावकऱ्यांची अपेक्षा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सहजरीत्या उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा रहिवासी परमेश्‍वर तांगडे आणि नामदेव भाडाळे यांनी मांडली.

फुरसुंगीचे गावकरीही कचरा डेपोमुळे उद्‌भवलेल्या समस्यांमुळे महापालिकेत जाण्याऐवजी डेपो हलविण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. महापालिकेत घेऊन कचरा डेपो हलविण्याचा प्रयत्न केला जाणार नसल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. 

पाण्याचे स्रोत पूर्णपणे दूषित झाले आहेत. डेपोची जागा संपली असतानाही कचरा टाकला जात असल्याने भविष्यात आणखी समस्यांना तोंड द्यावे लागण्याची त्यांना भीती आहे. त्यामुळे आता डेपो हलवून, मग आम्हाला महापालिकेत घ्या, अशी त्यांची मागणी आहे. येथील प्रमुख रस्ते ऐंशी आणि शंभर फुटांचे असल्याची कागदोपत्री नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यापेक्षा निम्मेच रस्ते आहेत. त्यामुळे फुरसुंगीच्या चारही बाजूंना वाहतूक कोंडीचा विळखा आहे. मुख्य रस्त्यालगतच्या बाजारपेठेमुळे फुरसुंगीकडे वळण घेणे अशक्‍य होते. रस्त्यांचा दर्जा चांगला आहे; मात्र ते अपुरे असल्याचे पावलोपावली जाणवते. या गावात जागोजागी बंगले आणि इमारती दिसून येतात. पण, त्याकरिता रस्ते आणि सांडपाणी वाहिन्यांचे नियोजन नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही वर्षांत नागरीकरण झपाट्याने वाढले; पण त्या प्रमाणात पायाभूत सेवा-सुविधा उभारलेल्या नाहीत. सध्या गावात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. परंतु, गावाच्या वाढीचा विचार करता, कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना आखण्याची गरज गावकऱ्यांनी व्यक्त केली. सुटसुटीत रस्ते, दवाखाना, उद्याने अशा स्वरूपाची कामे झाली पाहिजेत, असे जीवन हरपळे यांनी सांगितले. ‘पीएमपीची’ची सेवा विस्तारण्याची मागणीही त्यांनी केली. बाजारपेठांमध्ये वाहनांना शिस्त लावणारी व्यवस्था असावी, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com