हडपसरमधून कचरा प्रकल्पाला विरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

पाहुण्यांच्या गाड्या अडवू; चेतन तुपे, योगेश ससाणे यांचा इशारा

पाहुण्यांच्या गाड्या अडवू; चेतन तुपे, योगेश ससाणे यांचा इशारा
पुणे - रामटेकडी येथील नियोजित कचरा प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तयारी महापालिकेने केली असतानाच, हडपसरमध्ये आता एकही कचरा प्रकल्प उभारू देणार नसल्याची भूमिका हडपसरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली आहे. प्रकल्प सुरू करण्याच्या सध्या हालचाली झाल्यास, हडपसरमधून कचऱ्याची गाडी पुढे जाऊ देणार नाही. एवढेच नव्हे, तर प्रकल्पाच्या भूमिपूजनाला येणाऱ्या पाहुण्यांच्या गाड्या अडविण्याचा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि नगरसेवक योगेश ससाणे यांनी सोमवारी दिला.
दुसरीकडे, शहराच्या चहुबाजूंनी कचरा प्रकल्पाचे नियोजन करण्यापेक्षा हडपसरमध्येच कचरा प्रकल्प का उभारले जात आहेत? नागरिकांच्या विरोधानंतरही प्रकल्प सुरू केल्यास तेथील कचरा महापालिकेच्या दारात टाकण्याचा इशारा शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी दिला.

रामटेकडी परिसरातील महापालिकेच्या ताब्यातील 13 पैकी दहा एकर जागेत सुमारे साडेसातशे टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) परवानगी दिली आहे. त्यानुसार या जागेत प्रकल्प उभारण्याची तयारी महापालिकेने केली असून, पुढील आठवड्यात त्याचे भूमिपूजन करून प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर या प्रकल्पाला या भागातील भाजपवगळता, सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे.

तुपे म्हणाले, 'शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या चारही बाजूंना प्रकल्प उभारणीचे नियोजन हवे. मात्र, ते न करता केवळ हडपसर परिसरात प्रकल्प उभारले जात आहेत. त्यातच, या नव्या प्रकल्पासाठी सत्ताधारी भाजप पुढाकार घेत असून, या भागातील रहिवाशांचा विचार केला जात नाही. हडपसरमधील नागरिकांसाठी आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. मग, हे प्रकल्प का उभारता?''

ससाणे म्हणाले, 'स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वास न घेता, हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन होत आहे. त्याला आमचा विरोध आहे. या प्रकल्पासाठी सत्ताधारी आग्रही आहेत.''

दरम्यान, हडपसरमध्ये आता कचरा प्रकल्प उभारले जाऊ नयेत, यासाठी "स्वच्छ हडपसर, सुंदर हडपसर' ही मोहीम राबविणार असून, प्रकल्पाला विरोध म्हणून सह्यांची मोहीम घेणार असल्याचे भानगिरे म्हणाले.

कचरा हडपसरमध्येच का?
पुण्याचा कचरा हडपसरमधील नागरिकांनी सहन करण्याचा ठेका उचलला आहे का, असा प्रश्‍नही चेतन तुपे यांनी उपस्थित केला. या आधीही, कचरा डेपो, गोठे, डुकरांचे पुनर्वसन आदी प्रकल्पही याच भागात उभारले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍नही तुपे यांनी विचारला. कचरा प्रकल्प हडपसरच्या माथी मारण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते...

04.18 PM

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

11.12 AM

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM