शिवसृष्टीसाठीच्या पर्यायांचा अहवाल द्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पुणे - शिवसृष्टी आणि मेट्रोचे स्थानक कोथरूडमध्ये एकाच जागेवर उभारण्यासाठीच्या पर्यायांचा तातडीने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचा आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत दिला. कोथरूडमधील नियोजित जागेवर शिवसृष्टी साकारणे शक्‍य न झाल्यास त्यापासून काही अंतरावरील जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) जागेचाही पर्याय खुला आहे. त्यासाठी आर्थिक आणि प्रशासकीय प्रक्रियेची माहिती सादर करावी, असेही बापट यांनी स्पष्ट केले. 

पुणे - शिवसृष्टी आणि मेट्रोचे स्थानक कोथरूडमध्ये एकाच जागेवर उभारण्यासाठीच्या पर्यायांचा तातडीने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचा आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत दिला. कोथरूडमधील नियोजित जागेवर शिवसृष्टी साकारणे शक्‍य न झाल्यास त्यापासून काही अंतरावरील जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) जागेचाही पर्याय खुला आहे. त्यासाठी आर्थिक आणि प्रशासकीय प्रक्रियेची माहिती सादर करावी, असेही बापट यांनी स्पष्ट केले. 

कोथरूडमधील कचरा डेपोच्या 28 एकर जागेवर मेट्रो प्रकल्पांतर्गत डेपो होणार आहे. तर, याच जागेवर शिवसृष्टी करण्याचा ठराव महापालिकेने पूर्वीच केला आहे. त्यामुळे या जागेवर मेट्रो डेपो भूमिगत करून त्यावर शिवसृष्टी उभारावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अजित पवार, दीपक मानकर आदींनी लावून धरला आहे. मात्र, तसे करण्याबाबत महामेट्रोकडून साशंकता व्यक्त होत आहे. या बाबतचा तिढा सोडविण्यासाठी पालकमंत्री बापट यांच्या पुढाकाराने मुंबईत बैठक झाली. महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

शिवसृष्टी आणि मेट्रोचे स्थानक एकाच ठिकाणी उभारणे शक्‍य असल्याचे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादरीकरण करून दाखविले. त्यासाठी किती जागा लागेल, खर्च किती होईल आदींचा तपशील तयार करण्यास बापट यांनी सांगितले. तसेच डेपोसाठी महामेट्रोला 40 एकर तर शिवसृष्टीसाठी 8 एकर जागा लागणार आहे. दोन्ही एका ठिकाणी तयार करायचे असेल तर, त्यासाठी जागेचे नियोजन कसे करावे लागेल, याचाही तपशील तयार करण्यास सांगितले. डेपोच्या जागेवर शिवसृष्टी शक्‍य झाली नाही तर, त्यापासून काही अंतरावर "बीडीपी'च्या जागेवर शिवसृष्टी करता येईल. त्यासाठी जागा अधिग्रहीत करावी लागेल आणि मोबदला किती द्यावा लागेल, याचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. 

आमदार भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, एमआयएमच्या गटनेत्या अश्‍विनी लांडगे, नगरसेविका सुनीता वाडेकर, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम, संतोष पाटील आदी उपस्थित होते. 

आठवड्यात बैठक 
मेट्रो डेपो आणि शिवसृष्टी एकाच ठिकाणी करता येईल का, या बाबत चाचपणी करण्यासाठी नगर विकास खात्यातील प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, महामेट्रोचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि नितीन देसाई यांची या आठवड्यात बैठक होईल. त्यात नियोजित आराखड्याबाबत एकत्रित चर्चा होणार आहे. 

शिवसृष्टी ते रामवाडी 
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे "शिवसृष्टी ते रामवाडी' असे नामांतर करावे, अशी मागणी दीपक मानकर यांनी पालकमंत्री बापट आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली. या मार्गाचे काम सुरू असतानाच नामांतराचा हा बदल स्वीकारण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी त्यात केली.

Web Title: pune news girish bapat