पालकमंत्री म्हणतात, पुण्याची वाहतूक असुरक्षित!

डायस प्लॉट - उड्डाण पुलाच्या कामाचे शुक्रवारी भूमिपूजन करताना गिरीश बापट. या वेळी मुक्‍ता टिळक, श्रीनाथ भिमाले, योगेश मुळीक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी.
डायस प्लॉट - उड्डाण पुलाच्या कामाचे शुक्रवारी भूमिपूजन करताना गिरीश बापट. या वेळी मुक्‍ता टिळक, श्रीनाथ भिमाले, योगेश मुळीक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी.

पुणे - शहरात दररोज अपघातांमध्ये नागरिकांचे बळी जात आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालताना असुरक्षित वाटत आहे, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी सध्याच्या वाहतूक व्यवस्थेवर ताशेरे ओढले. 

सेव्हन लव्ह चौक ते वखार महामंडळ चौकादरम्यान बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी बापट बोलत होते. महापौर मुक्‍ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर आदी या वेळी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य व्यक्‍तीला केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात टळतील.’’ गोगावले म्हणाले, ‘‘भाजपकडून विकासकामे केली जात आहेत. परंतु प्रसारमाध्यम आणि विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत.’’ 

टिळक, कांबळे, मिसाळ व भिमाले यांनीही मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचालन गोपाळ चिंतल यांनी केले. भरत वैरागे यांनी आभार मानले.

आधी सुविधा मग पार्किंग धोरण 
महापालिकेने पार्किंग धोरण आखले पाहिजे; परंतु नागरिकांना पार्किंगचे वेडेवाकडे दर लावणे योग्य होणार नाही. पार्किंगसाठी प्लॉट विकसित केल्याशिवाय हे धोरण राबविण्यात येऊ नये. तसेच नागरिकांकडून दर आकारणी करू नये, असे मत गोगावले यांनी व्यक्‍त केले.  

बिगरलग्नाचा आहेस, तर भाजपमध्ये ये...
पालकमंत्री बापट हे भाषणासाठी उठले. त्या वेळी एक तरुण मोबाईलवर बोलत जात होता. त्याला उद्देशून बापट म्हणाले, ‘काय बायकोशी बोलतोस का?’ त्यावर त्या तरुणाने लग्न झाले नसल्याचे सांगितले. त्यावर बापट यांनी ‘तू बिगर लग्नाचा आहेस, तर भाजपमध्ये ये. तुला नोकरी देतो, रोजगार देतो. मात्र एकच लग्न कर.’ पालकमंत्र्यांच्या या मिश्‍किलपणावर विरोधकांना चर्चेचा विषय मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com