बापट-काकडे भेटीबाबत आश्‍चर्य!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

पुणे - पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी जाऊन भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी त्यांना दीपावलीचे औचित्य साधून गुरुवारी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे भाजप वर्तुळातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

पुणे - पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी जाऊन भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी त्यांना दीपावलीचे औचित्य साधून गुरुवारी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे भाजप वर्तुळातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

बापट आणि काकडे यांच्यात अनेकदा ‘फटाके’ फुटत असतात. दोघांमध्ये काही वेळा स्पर्धा जाणवते अन्‌ महापालिकेच्या निवडणुकीतही ती दिसून आली. बापट यांच्यानंतर पुण्याची सूत्रे आपल्याच हाती असतील, असा दावा काकडे यांनी खासगीत केल्यापासून भाजपमधील बापट समर्थक गट काकडे यांच्यापासून दूर राहू लागला. त्यामुळे ‘स्वच्छता अभियाना’ची पर्वणी साधत तब्बल ४० हून अधिक नगरसेवकांना सहभागी करून घेण्यात काकडे यशस्वी ठरले होते. मात्र बापट यांनी १५ ऑक्‍टोबर म्हणजे रविवारी शनिवारपेठेत आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला काकडे अनुपस्थित होते. त्या वेळी ते शहरात नव्हते, असे सांगण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर काकडे यांनी बापट यांच्या घरी जाऊन त्यांना गुरुवारी शुभेच्छा दिल्या. त्या वेळी उपस्थितांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. ख्याली-खुशालीबद्दल थोडी-फार चर्चा झाली, पण औपचारिक पद्धतीने, असे उपस्थितांनी नमूद केले. तत्पूर्वी काकडे यांनी नगरसेवक धीरज घाटे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली. तेथे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी संवाद साधला अन्‌ सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.