आधार कार्ड नसले तरीही धान्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

पुणे - ज्या रेशन कार्डधारकांची आधारजोडणी नसेल, त्यांना एक ऑक्‍टोबरपासून स्वस्त धान्य न देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला होता. परंतु, दिवाळीमुळे हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र धान्य घेणाऱ्यांना "आधार नाही' असे लेखी द्यावे लागणार आहे. तर दिवाळीनंतर "आधार'शिवाय धान्य वितरित न करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

पुणे - ज्या रेशन कार्डधारकांची आधारजोडणी नसेल, त्यांना एक ऑक्‍टोबरपासून स्वस्त धान्य न देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला होता. परंतु, दिवाळीमुळे हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र धान्य घेणाऱ्यांना "आधार नाही' असे लेखी द्यावे लागणार आहे. तर दिवाळीनंतर "आधार'शिवाय धान्य वितरित न करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेसह अन्य रेशन कार्डधारकांना (पांढरे आणि केशरी) स्वस्त अन्नधान्य घेण्यापूर्वी रेशन कार्डला आधारजोडणी करणे बंधनकारक आहे. बनावट लाभार्थींना वगळून गरजूंपर्यंत धान्य पोचावे यासाठी आधारसक्ती केली आहे. त्यामुळे "ई-पॉस मशिन'वर "थंब इम्प्रेशन'द्वारे कुटुंबातील सदस्यांना धान्य वितरित केले जात आहे. स्वस्त धान्य वितरणासाठी केंद्राने एक लाख 40 हजार कोटी अनुदान राज्याला दिले जाते. हे अनुदान योग्य लाभार्थींपर्यंत पोचविण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. अनुदानित गॅस सिलिंडरसाठी आधार कार्ड सक्तीच्या धर्तीवर रेशन कार्डलाही आधारजोडणी सक्तीची केली आहे.

परंतु, पुणे जिल्ह्यात रेशन कार्डला आधारजोडणीचे काम केवळ 39 टक्के इतकेच झाले आहे. तसेच, शहर आणि जिल्ह्यातील आधार कार्ड काढण्याची यंत्रणा सक्षम झालेली नाही. त्यामुळे नवीन आधार कार्ड काढणे शक्‍य नाही. म्हणून आधार नसेल तर धान्य न देण्याच्या निर्णयामुळे ऐन दिवाळीत गरजूंना स्वस्त धान्य व साखरेशिवाय दिवस काढावे लागले असते. तसेच, जे धान्य शिल्लक राहणार होते ते खुल्या बाजारात गरजूंना विकत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अखेर आधार जोडणी नसेल तर धान्य न देण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मात्र, दिवाळीनंतर हा निर्णय लागू केला जाईल.

दरम्यान, ज्या रेशन कार्डधारकांनी आधार कार्ड जोडणी केली नाही, त्यांनी तातडीने आधार कार्ड सादर करावे, असे आवाहन पुणे विभागाच्या पुरवठा विभागाने केले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार रेशन कार्डला आधार कार्ड जोडणी बंधनकारक आहे. त्यामुळे एक ऑक्‍टोबरपासून आधार कार्ड नसलेल्या रेशन कार्डधारकांना स्वस्त अन्नधान्य न देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु दिवाळीमुळे हा निर्णय मागे घेतला आहे.
- नीलिमा धायगुडे, उपायुक्त, पुरवठा विभाग, पुणे विभागीय आयुक्तालय

Web Title: pune news Grain even if no Aadhar card