पूजेच्या साहित्य विक्रीवर नाही ‘जीएसटी’चा परिणाम 

पूजेच्या साहित्य विक्रीवर नाही ‘जीएसटी’चा परिणाम 

पुणे - आषाढ महिन्यापासूनच विक्रेते श्रावणाच्या तयारीला लागले. परंतु वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाला, तरी धार्मिक उलाढालीवर फारसा परिणाम झालेला नाही. कापसाच्या वातींपासून ते सर्वप्रकारच्या पूजेचे साहित्य, धार्मिक पुस्तके, फूल विक्रेत्यांसहित उपवासाच्या पदार्थांची रेलचेल बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. श्रावणानिमित्त पुणे शहरातील दररोजची उलाढाल सत्तर ते ऐंशी हजारांहून अधिक होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे शहराचे श्रावणातले धार्मिक अर्थकारण साडेचार ते पाच कोटींपर्यंत पोचेल, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.  

श्रावणात धार्मिक साहित्य, वस्तू, फुले, फळे, उपवासाच्या पदार्थांसह पुरोहितांसही मागणी असते. पुरोहितांच्या तारखा गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बुक झाल्या आहेत. नागपंचमी, श्रीयाळशेठ षष्ठी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, गोपाळकाला (दहीहंडी), श्रावणी सोमवार, दर्श-पिठोरी अमावास्या या सणवारांसह व्रतांच्या पूजाअर्चा असतात. मंगळागौर पूजा, सोळा सोमवार व शुक्रवारचे व्रत असते. धार्मिक ग्रंथाची पारायणे होतात. त्यामुळे प्रकाशकांसहित, पुरोहित, फळे-फुले विक्रेत्यांना अगोदर नियोजन करावे लागते. वाती वळणाऱ्या महिलांपासून ते कुंभारांसहीत अनेकांना रोजगार मिळतो. 

‘‘गुरुचरित्र, नवनाथभक्तिसार, काशीखंड, हरिविजय, भक्तविजय, रामविजय, पांडवप्रताप, श्रीजैमिनी अश्‍वमेघ, कथा कल्पतरू आदी ग्रंथांचे भाविक श्रद्धेने पारायणे करतात. आषाढ महिन्यापासूनच आम्ही प्रकाशकांना ऑर्डर देतो. सप्तवार व्रतकथा, कहाणी संग्रह, सत्यनारायणपूजा, सार्थपूजा संग्रह, सोळा सोमवारचे व्रत, संपूर्ण चातुर्मास ही पुस्तके भाविक खरेदी करतात. एका दुकानदाराची सरासरी विक्री दोन ते तीन लाखांपर्यंत होते,’’ असे विक्रेते स्वरूप नेर्लेकर यांनी सांगितले.  

‘‘समिधा, सुपाऱ्या, बदाम, खारीक ते सत्यनारायण पूजा, मंगळागौर पूजा यासह लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र तसेच सर्व व्रतांच्या पूजेच्या साहित्याची हमखास खरेदी विक्री होते. सण हे अर्थकारणाचा अविभाज्य भाग आहे. पूजा साहित्यातूनही कोट्यवधींची उलाढाल होते. पुणे शहरात श्रावणात दहा-पंधरा लाखांपर्यंत उलाढाल होते,’’ असे विक्रेते धनंजय घोलप म्हणाले.  

‘‘फळांना बाराही महिने मागणी असते. श्रावण म्हणून उलाढाल वाढते असे होत नाही. मात्र तरीही दररोज पाच ते सहा कोटींची उलाढाल पुणे शहरात फक्त श्रावणात होते,’’ असे फळविक्रेते करण जाधव म्हणाले. 

नाना मुळे (गुरुजी) म्हणाले, ‘‘पुरोहितांना श्रावण-भाद्रपदात चांगली अर्थप्राप्ती होते. सत्यनारायणाच्या पूजा पुष्कळ ठिकाणी करतात. त्यामुळे पुरोहित मंडळी एकमेकांसमवेत नियोजन करतात. व्हॉट्‌सॲपवरून एकमेकांशी संपर्क साधून धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक आखतो.’’ 

श्रावणात दररोज सात हजार प्लेट खिचडी खपते. साबुदाणा वडा, उपवासाचे फरसाण, बटाटा चिवडा, शेंगदाण्याचा लाडू, राजगिरा लाडू, वेफर्सलाही मागणी असते. दररोज दीड हजार किलो चिवडा खपतो. उपवास करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही मात्र आवडीने अनेकजण उपवासाच्या पदार्थांचा आस्वाद घेतातच. श्रावणात दोन-अडीच कोटींची विक्री होते.
- किशोर सरपोतदार, महासचिव, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com