वायर, स्वीच महाग होणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

पुणे - वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) इलेक्‍ट्रिक वायर, स्वीच यांच्या किमतीत वाढ होणार आहे. एलएडी बल्ब व ट्यूबच्या किमती स्थिर राहतील आणि एलएडी स्वीच स्वस्त होतील, असा अंदाज आहे. वीस लाख रुपयांच्या उलाढालीची तरतूद छोट्या व्यावसायिकांना त्रासदायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

पुणे - वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) इलेक्‍ट्रिक वायर, स्वीच यांच्या किमतीत वाढ होणार आहे. एलएडी बल्ब व ट्यूबच्या किमती स्थिर राहतील आणि एलएडी स्वीच स्वस्त होतील, असा अंदाज आहे. वीस लाख रुपयांच्या उलाढालीची तरतूद छोट्या व्यावसायिकांना त्रासदायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

जुलै महिन्यापासून "जीएसटी' लागू होत आहे. या करामुळे गृहोपयोगी वस्तूंच्या किमतीवर काय परिणाम होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. गृहोपयोगी वस्तूंमध्ये इलेक्‍ट्रॉनिक आणि इलेक्‍ट्रिक वस्तूंचा समावेश असून, वातानुकूलित यंत्रणा, रेफ्रिरेजटर महाग होणारच आहे; पण त्याशिवाय इतर उपकरणांच्या किमतीत काय बदल होईल, याविषयी व्यापारी किशोर ओसवाल यांनी माहिती दिली. ""जीएसटीचा वायरच्या किमतीवर मोठा परिणाम होणार आहे. पूर्वी वायरच्या किमतीवर व्हॅट आणि उत्पादन शुल्क धरून साडेअठरा टक्के कर आकारला जात होता. तो आता 28 टक्के इतका लागू होणार आहे. साडेनऊ टक्के कर वाढला असून, इलेक्‍ट्रिक केबल आणि वायर यांच्या किमतीत वाढ झाल्याने गृहसजावट, नवीन घरातील वायरिंगचे काम अधिक खर्चिक होईल. होमअप्लायंसेसवर दीड टक्के अधिक, सीएफएल बल्बवर आठ टक्के अधिक कर द्यावा लागणार आहे. एलएडी दिव्यांवर कर लावला नसून, त्यासाठी आवश्‍यक असलेले "फिक्‍श्चर्स' वरील करात साडेनऊ टक्के सवलत दिली गेली आहे. त्यावर केवळ बारा टक्के इतका लागणार आहे. ही तेवढी जमेची बाजू आहे.'' 

जीएसटीमधील उलाढालीच्या तरतुदीचा फटका छोट्या व्यावसायिकांना बसेल, अशी भीती व्यापारी मनोज सारडा यांनी व्यक्त केली आहे. 20 ते 30 लाख रुपयांची उलाढाल असणाऱ्यांना रिटर्न फाइल करावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचे काम वाढणार आहे. संगणक, इंटरनेट आदी गोष्टी बंधनकारक केल्याचा त्रासही व्यापाऱ्यांना सहन करावा लागणार आहे. ही मर्यादा सरकारने वाढविणे आवश्‍यक आहे. कापडांवर पूर्वी केवळ उत्पादन शुल्क लागू होते. जीएसटीमध्ये ते पाच टक्के केले आहे. साडीवरही हा कर लागू केला गेला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आज कार्यशाळा 
जीएसटीविषयी पुणे व्यापारी महासंघातर्फे सोमवारी सायंकाळी 5 वाजता अण्णा भाऊ साठे सभागृहात कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत उत्पादन शुल्क अप्पर आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर, अप्पर विक्रीकर आयुक्त ओमनारायण भांगडिया, सहआयुक्त प्रशांत नांदेडकर हे व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती महासंघाच्या वतीने देण्यात आली.