18 लाखांचा गुटखा "एफडीए'कडून जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

पुणे - अन्न व औषध द्रव्य प्रशासनाने (एफडीए) वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या छाप्यांतून 18 लाख 78 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. शहरातील गुटख्याच्या वाढत्या विक्रीस आळा घालण्याच्या दृष्टीने "एफडीए'च्या पुणे विभागातर्फे शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्या अंतर्गत "एफडीए'ने मंगळवारी रात्री येरवडा येथील बिजली ट्रेडर्समधून 65 हजार 880, खराडीतील माताजी जनरल स्टोअर्समधून सहा लाख 38 हजार आणि गणेश सुपर शॉपमधून तीन लाख 35 हजार रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला, अशी माहिती सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली. गुटखा आणि पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या एकास संघटित गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी विरोधी पथकाच्या दक्षिण विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ लाख 39 हजार 700 रुपये किमतीचा गुटखा जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

शहराच्या वेगवेगळ्या भागात टाकलेल्या चार छाप्यांमधून 18 लाख 78 हजार 700 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. सहायक आयुक्त अपर्णा भोईटे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी का. सु. शिंदे, खेमा सोनकांबळे, अस्मिता गायकवाड, जे. बी. सोनवणे, प्रशांत गुंजाळ यांनी ही कारवाई केली. या वेळी चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी सुरक्षा व्यवस्था पुरविली.