अपंगत्वावर मात करून ते जिद्दीने करताहेत व्यवसाय

विनायक कुमावत
विनायक कुमावत

हडपसर : जन्मतः दोन्ही पायाने अपंगत्व. ज्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले. तरी पण खचून न जाता व कोणा पुढे हात न पसरता तो अपंगत्वावर मात करून जिद्दीने तीनचाकी सायकलच्या सहाय्याने उदबत्ती व पूजेचे साहित्य विक्रीचा व्यवसाय करत आहे. स्वयंरोजगारातू तो आर्थिकदृष्टया तो स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या या जिद्दी दिव्यांग तरूणाचे नाव विनायक उत्तम कुमावत असे आहे. त्याची जिद्द व प्रेरणादायी प्रवास धडधाकड माणसांना देखील प्रेरणादायी आहे. 

सुरवातील विनायक तीनचाकी सायकलवर फिरून पापड विक्री करत. आई मंगल त्यांना पापड तयार करून देत. मात्र आई वृध्द झाल्याने पापड तयार करणे त्यांना शक्य होत नव्हते. परिणामी विनायकला हा व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर त्याच्या मित्राने कॅाईन बॅाक्स भेट दिला. पुढे मोबाईलच्या क्रांतीमुळे हा व्यवसाय चालू शकला नाही. पुढे त्याने जनरल स्टोअर सुरू केले. सुरवातीला या व्यवसायत त्याने चांगली प्रगती केली. मात्र स्पर्धा व समाजातील विक्षिप्त लोकांच्या त्रासाला कंटाळून त्याला हा व्यवसाय नाईलाजास्तव बंद करावा लागला. मात्र त्याची जिद्द त्याला शांत बसून देत नव्हती. हार न मानता गेल्या पाच वर्षापासून त्याने तीनचाकी सायकलवर पून्हा उदबत्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आता या व्यवसायात त्याचा चांगलाच जम बसला आहे. मंत्रीमार्केट, डॅा. राममनोहर लोहिया उदयान, काळेपडळ, ससाणेनगर या भागात तो हा व्यवसाय करतो. रोज सकाळी दहा ते सायंकाळी दहा असा बारा तास तो हा व्यवसाय करतो. 

विनायक सकाळ शी बोलताना म्हणाला, दुर्देवाने एकदा तीन चाकी सायकलवरून व्यवसाय करताना मी खाली पडलो. एका पायाच्या खुब्याची मोठी शस्त्रक्रीया करावी लागली. यापूर्वी अपंगत्वाची तिव्रता कमी करण्यासाठी माझ्या दोन्ही पायांवर सातवेळा शस्त्रक्रीया झाल्या. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. तीनचाकी सायकलवर दिवसभरात १५ ते २० किलोमिटर प्रवास करावा लागतो. हाताने सायकल चालवावी लागते. त्यात माझा एक हात देखील काम करत नाही. त्यामुळे सायकल चालविताना जीव मेटाकुटीला येतो. अनेकदा अपंगत्वावरून मला मुले चिडवितात, त्रास देतात. माल विकल्यानंतर पैसे न देताच काहीजण निघून जातात. रोजच अपमान व दुःखाला सामोरे जावे लागते. माझी आई मंगल व बहिण अंजली आणि माझ्या मित्रांचा मला पाठिंबा असल्याने मी खचून न जाता पून्हा नव्या उमेदीने कामाला लागतो. आता मला उदबत्ती बनविण्याचे मशीन घ्यावयाचे आहे. घरीच उदबत्त्या तयार केल्याने माझ्या नफ्यात वाढ होईल. नियमितपणे व प्रामाणिकपणे हा व्यवसाय करीत असल्याने कुटूंबाला माझा हातभार लागत आहे. अपंग म्हणून स्वस्थ बसून राहणे मला मान्य नाही. आपणच आपले भवितव्य घडवून शकतो, या आत्मविश्वासने मी हे काम स्वीकारले आहे. 

विनायक अन्य दिव्यांगाच्या सर्वांगिण पुर्नवसनासाठी नेहमीच धडपड करीत असतो. आपल्या उत्पन्नातील काही भाग सेवाभावी संस्थाना देतो. आज समाजात अनेक निरोगी, धडधाकट तरूण नोकरी नसल्यामुळे नाउमेद होताना दिसतात. अपंगत्वाचा बाउ करीत काहीजण रडत बसतात. पण नाउमेद न होता छोटा व्यवसाय करून, स्वयंरोजगाराचे साधन निर्माण करता येवून शकते, हेच विनायक यांनी सर्वांना दाखवून दिले आहे. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अत्मविश्र्वासाने काम केल्यावर कोणीही यशस्वी व्यावसायिक होउ शकतो. असा कानमंत्र कुमावत यांनी त्यांच्या दिव्यांग मित्रांना व समाजाला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com