"हरिहरन... तेरे बिना हम कैसे जियें?' 

"हरिहरन... तेरे बिना हम कैसे जियें?' 

पुणे - नवनवीन अंगविक्षेप अन्‌ "आवाजविक्षेप' करत आपली स्टाईलबाज गायकी कितीही जोरात सादर केली आणि त्यातून कितीही लाइक्‍स, कमेंट्‌स आणि फॉलोअर्स मिळविले, तरीही खरा गळा हा खरा गळाच असतो आणि त्याचा करिष्मा हा नखशिखान्त शब्दशः ईश्‍वरीच असतो, याची प्रचिती पुणेकरांनी मंगळवारी सायंकाळी अनुभवली... संगीताविष्काराचा हा नितांतसुंदर अनुभव रसिकांच्या ओंजळीत भरभरून ओतला तो आपल्या जरीदार आवाजाने आजवर असंख्य चाहते निर्माण केलेल्या हरिहरन या दिग्गज गायकाने! 

युवा वाद्यपथक, शिवसाम्राज्य वाद्यपथक आणि शिववर्धन वाद्यपथक आयोजित राज्यातील विविध ढोलताशा पथकांच्या एकत्रित वाद्यपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना हा अनुभव घेता आला. निमित्त जरी वाद्यपूजनाचं असलं आणि त्यानंतर जोरदार ढोलताशा वादनसुद्धा झालं असलं, तरी आजचा दिवस अनेकांनी आपल्या आठवणींच्या कुपीत कायमचा दडवून ठेवला तो खरा हरीजींच्या गाण्यांनी, त्यांनी उपस्थितांशी हिंदी अन्‌ मराठीतही मारलेल्या मनसोक्त गप्पांनी आणि खरं तर या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या केवळ मंचावरच्या चैतन्यमय वावराने...! 

हरीजींना पाहताना, ऐकताना लोक नुसते खूष झाले नव्हते, तर हरखून गेले होते, हरवून गेले होते. याचा कळस तेव्हा झाला, जेव्हा हरीजींनी थेट मंचावर येत ताशावादन करत आपल्या असीम ऊर्जेचा प्रत्यय दिला. तब्बल अडीच तास एखाद्या वेगळ्याच जगात गेल्यासारखं या "परफेक्‍शनिस्ट' गायकाने श्रोत्यांना आपल्या अनेक गाण्यांसह विहरवूनच आणलं. 

साडेसातच्या सुमारास हरिहरन यांचं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आगमन झालं. आगमन कसलं, त्याला एक दिमाखदार स्वागत सोहळाच म्हणावा, असं ते होतं. नाट्यगृहात उभं राहायलाही जागा नसावी, अशा तुडुंब रसिकगर्दीने हरीजी आत आल्या आल्या "तू ही रे, तू ही रे, तेरे बिना मैं कैसे जियू' हे गाणं एकाच सुरात गात त्यांचं आगळंवेगळं स्वागत केलं. या वेळी मात्र हरखून जाण्याची वेळ खुद्द हरीजींची होती! त्यांनी मोठ्या प्रेमाने या गाण्याचा स्वीकार केला आणि श्रोत्यांनीही त्यांना त्या वेळी जणू आवर्जून म्हटलं- "हरिहरन... तेरे बिना हम कैसे जिये?'... 

लयीत वादनसराव केल्यास आपल्या हृदयाची लय उत्तम राहते... प्रत्येक थाप ही लयीत म्हणूनच आवश्‍यक आहे. या सगळ्यांतून विचारांची लय आणि खरं तर आपल्या जीवनाची लयच सुरेख होऊन जात असते. आज मुलं हुशार आहेत; पण त्यांना मनःशांती नाही. "फेमस होण्यापलीकडे' गाणं शोधा! 
- हरिहरन, गायक 

आणि आठवलं रिसेप्शन! 
हरिहरन यांना गायनक्षेत्रात नुकतीच 40 वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांना 40 वेगवेगळी गिफ्ट्‌स देण्यात आली. या भेटी पाहून ते म्हणाले, ""आज मला माझ्या लग्नाचं रिसेप्शन आठवतंय!''... यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला, हे वेगळं सांगायला नको. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com