आजारापेक्षा उपचाराच्या वेदना असह्य

आजारापेक्षा उपचाराच्या वेदना असह्य

पुणे - तळपायामध्ये होणारी वेदना असह्य होत असल्यामुळे एक मुलगी आईला जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात घेऊन आली. बाह्यरुग्ण विभागात पोचल्यावर तिने एका परिचारिकेला डॉक्‍टरांबाबत विचारणा केली. आईकडे एक नजर टाकत परिचारिकेचा पहिला प्रश्‍न होता ‘केसपेपर काढला आहे का?’ त्याला ‘नाही’ असे उत्तर होते. ‘आधी केसपेपर काढा’ त्याशिवाय काही होणार नाही, असा आदेश वजा इशारा परिचारिकेने दिला. ती मुलगी ‘केसपेपर’ काढण्यासाठी गेली. तिथे मोठी रांग होती. अर्धा तासानंतर नंबर मिळाला.

आईचा त्रास क्षणाक्षणाला वाढतच होता. डॉक्‍टरांच्या खोलीबाहेरही मोठी रांग. जवळजवळ सर्वच रुग्णांची स्थिती आईसारखीच. दोन तासांनंतर नंबर लागला. आत गेल्यावर डॉक्‍टरांनी तपासणी केली आणि काही चाचण्या करण्यास सांगितले. या चाचण्या करण्याच्या ठिकाणीही रांग!  पुढे औषध दुकानातही गर्दी! दोन तासांनी पुन्हा डॉक्‍टरांकडे आल्यावर त्यांनी आईला भरती होण्यास सांगितले. मात्र बेड उपलब्ध नव्हता...!  ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळलेले हे झाले प्रतिनिधीक उदाहरण पण, वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांत येणाऱ्या जवळपास सर्वच रुग्णांना असाच अनुभव येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ससून रुग्णालय, भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल आणि श्रीमती काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांत पाहणी केल्यावर अशीच स्थिती दिसून आली. 

रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी रुग्णालय सुसज्ज करण्यात आले आहे. त्यामुळे आता गरीब आणि गरजू रुग्णांबरोबरच मध्यमवर्गीयांची संख्याही वाढली आहे.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

विद्यालयांशी संलग्न रुग्णालयांवरील रुग्णसेवेचा ताण सातत्याने वाढत आहे. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. पण, सरकारी वैद्यकीय विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी हा यातील सर्वोत्तम मार्ग आहे.
- डॉ. ए. व्ही. भोरे,  संचालक, काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय

का वाढतीय गर्दी?
महागड्या वैद्यकीय सेवेमुळे सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार घेणे अशक्‍य आहे. यामुळे सरकारी, महापालिकेसह वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांचा आधार घेणाऱ्या या रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांची गर्दी वाढल्याने येथील व्यवस्थेवर ताण येत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी रुग्णसेवेकडे काहीसे दुर्लक्ष करीत असल्याचे पहाणीतून दिसत आहे. शहरात ५६ मोठी रुग्णालये आहेत. मात्र, येथील वैद्यकीय सेवा सामान्य रुग्णांच्या आवाक्‍याबाहेर गेली आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना ससून रुग्णालय, महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय, नवले रुग्णालय आणि भारती रुग्णालयाशिवाय पर्याय राहिलेला नाही. 

केसपेपरच्या दरातील फरक
खासगी रुग्णालयातील केसपेपरचे शुल्क ४०० रुपयांपर्यंत आहे. कमला नेहरू रुग्णालयात पाच रुपये तर ससून रुग्णालयात दहा रुपये घेतले जातात. काशिबाई नवले रुग्णालयात केसपेपर मोफत दिला जातो. 

असा होतोय परिणाम?
सरकारी रुग्णालय, सवलतीत उपचार करणाऱ्या शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये थोड्या फार फरकाने अशीच परिस्थिती आहे. विशेषतः बाह्यरुग्ण विभागामध्ये तर ही परिस्थिती बिकट आहे. आजारामुळे त्रस्त असणाऱ्या रुग्णाची रुग्णालयात प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता करता-करता दमछाक होते. स्पष्ट सूचनांचा अभाव, कर्मचाऱ्यांचे उद्धट वागणे, प्रत्येक ठिकाणी रांग, नियमित उपचार घेणारे रुग्ण आणि नव्याने येणारे रुग्ण यांच्या बाबतीत सुसूत्रता नसल्याचे दिसते.

नेमकी समस्या काय?
शहरातील ४० टक्के लोकसंख्या झोपडपट्ट्यात रहाते. त्यांच्यासह कनिष्ठ मध्यम वर्गीयांना मोठ्या रुग्णालयांमधील महागडे उपचार परवडत नाही. सुरवातीला हे रुग्ण जवळच्या डॉक्‍टरांचा सल्ला घेतात. तेथून औषधे घेऊन आजार बरा न झाल्यास महापालिकेच्या रुग्णालयात जातात. मात्र, औषधांचा, तपासण्यांचा खर्च वाढल्यानंतर हे रुग्ण उपचारांसाठी ससून, नवले, भारती या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांकडे वळतात, असे येथील रुग्णांशी बोलल्यानंतर स्पष्ट होते. 

उपाय काय?
महापालिकेची रुग्णालये रुग्णसेवेसाठी सक्षम करणे, हा यावरचा प्रभावी उपाय असल्याचे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सांगितले. महापालिकेचे कमला नेहरू वगळता इतर रुग्णालयांमध्ये अद्ययावत वैद्यकीय सुविधा नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com