महामार्गांवरील समस्यांबाबत संसदेत ‘आव्वाज’

महामार्गांवरील समस्यांबाबत संसदेत ‘आव्वाज’

पुणे - पुणे-बंगळूर महामार्गावरील समस्यांना वाचा फोडल्याबद्दल ‘सकाळ’चे अभिनंदन करून आगामी संसदीय अधिवेशनात याबाबत प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांना भेटून ‘पुणे- बंगळूर’ महामार्गावरील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.

कामातील दिरंगाई, निकृष्ट दर्जाची कामे, अपूर्ण सेवा रस्ते, भुयारी मार्ग आणि उड्डाण पुलांच्या रखडलेल्या कामांमुळे देहू रस्ता ते सातारा दरम्यानचा रस्ता धोकादायक बनला आहे. या स्थितीमुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांना प्राणाला मुकावे लागले. दरम्यान, याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया- एनएचएआय) विचारणा केली असता संबंधित खासगी कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत विविध कामांचा आढावा घेणार. 
 महामार्गांवरील तांत्रिक, विद्युत व अग्निरोधक सुरक्षेचा आढावा घेणार.

दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा करू
देहूरस्ता ते सातारा दरम्यानच्या महामार्गांवरील विविध कामांचा आढावा ‘एनएचएआय’च्या पदाधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. या संदर्भात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुन्हा समस्या मांडणार आहे. येथील कामे मार्गी लावण्याबरोबरच संबंधित दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल.

‘संसदेत विषय लावून धरणार’
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग ऊर्फ अप्पा बारणे म्हणाले, ‘‘पुणे- बंगळूर महामार्गांवरील कामांच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून संसदेत मी प्रश्‍न उपस्थित करीत आहे. यापुढेही पाठपुरावा करणार आहे. हा विषय लावून धरल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार मानतो. लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहे.’’ 

‘बातम्यांच्या कात्रणांसह आवाज उठविणार’
राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून मी स्वतः या संदर्भात वारंवार प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ‘सकाळ’च्या माध्यमातून हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या सर्व बातम्यांच्या कात्रणासह लेखी पत्र केंद्रीय मंत्री गडकरी यांना पाठविणार आहे’’

एकाही मंत्र्यामध्ये धमक नाही
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘काही महिन्यांपूर्वीच पुण्यात आढावा बैठक झाली. त्यात ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांना या संदर्भात खडसावले होते. ‘रिलायन्स इन्फ्रा’ कंपनीवर कारवाई करण्याची धमक व हिंमत एकाही केंद्रीय मंत्र्यामध्ये नाही. तरीही केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com