जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू

जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू

घाशीराम कोतवाल वाडा
पुलगेटजवळील ‘आरआयएएसई’ बेकरीच्या पाठीमागे हा वाडा होता. घाशीरामने त्याच्या निवासस्थानाजवळ उद्यान व एक मंदिरही उभारले होते. ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांनी हा वाडा पाडला. त्यामुळे फक्त वाड्याच्या प्रवेशद्वाराचे काही अवशेष शिल्लक आहेत. याबरोबरच फाशीगेटही आहे. सध्या ही जागा भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या तत्कालीन कोतवालांची शहरावर चांगलीच जरब होती. त्यामुळेच इथे बलात्कार, खून यांसारखे प्रकार घडत नसल्याचा उल्लेख ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून आल्याचे द. ब. पारसनीस यांच्या पुस्तकात आहे.

रेसकोर्स
गोळीबार मैदानाकडून सोलापूर रस्त्याला लागल्यानंतर एक-दोन सिग्नलच्या पुढे डाव्या बाजूला ‘द टर्फ क्‍लब’चे प्रवेशद्वार दिसते. त्यापुढे लगेचच वर्तुळाकार मोठ्या स्वरूपातील रेसकोर्सचे मैदान नजरेस पडते. लोखंडी जाळी आणि त्यानंतर वर्तुळाकार लाकडी कुंपण असलेले रेसकोर्स म्हणजेच घोड्यांच्या शर्यतीचा मोठा परिसर कॅंटोन्मेंटच्या स्थापनेनंतर तेरा वर्षांनी म्हणजेच १८३० मध्ये भैरोबा नाल्याजवळ उभारण्यात आले. ११८ एकर जागेत हे रेसकोर्स वसविण्यात आले. येथेच प्रेक्षक गॅलरी, घोड्यांना ठेवण्यासाठीचे तबेले अशी रचना केलेली आहे. जुलै ते ऑक्‍टोबर या कालावधीतच इथे घोड्यांच्या शर्यती होतात. सुमारे पावणेतीन किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅकही येथे उपलब्ध असून, तो सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केला आहे. ‘द पुणे डर्बी’, ‘द आरडब्ल्यूआयटीसी गोल्ड कप’, ‘इंडिपेंडस कप’, ‘सदर्न कमांड कप’ यांसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धा येथे होतात.

क्‍लॉक टॉवर 
राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून काही अंतरावरच असलेल्या दक्षिण मुख्यालयाजवळ ‘क्‍लॉक टॉवर’ आहे. लष्कराच्या पुणे सब एरिया हेड क्वार्टरच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, फिफ्थ बटालियन द मराठा लाइट इन्फंट्री, थ्री बटालियन द जाट रेजिमेंट यांनी ‘क्‍लॉक टॉवर’ची उभारणी केली. पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडिअर एम. के. शेरीफ यांच्या हस्ते १६ ऑगस्ट १९५६ रोजी या ‘क्‍लॉक टॉवर’चे उद्‌घाटन झाले होते.

छत्रपती शिवाजी मार्केट
ब्रिटिश अधिकारी, सैन्याला आवश्‍यक भाजीपाला, फळे, मटण, मासळी यासारख्या आवश्‍यक वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्यात, या दृष्टीने ब्रिटिशांनी ‘छत्रपती शिवाजी मार्केट’ची उभारणी केली. जुलै १८८६ मध्ये तत्कालीन लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल डब्लू. एम. ड्युफे यांच्या मार्गदर्शनाखाली गॉथिक, इस्लामिक व मराठा शैलीचा अनोखा मिलाप असलेली ही वास्तू उभारण्यात आली. याचे क्षेत्रफळ ५६६५ चौरस मीटर असून, त्यातील मुख्य इमारतीच्या ३४६१.७५ चौरस मीटरच्या जागेवर भाजीमंडई, मासळी, चिकन, मटण मार्केटची वेगळी इमारत आहे. बीफ मार्केटसाठीदेखील स्वतंत्र इमारत आहे. १२१ वर्षांच्या या जुन्या इमारतीची सध्या पडझड होत आहे.

राष्ट्रीय युद्ध स्मारक 
स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ उभारले. लोकसहभागातून उभे राहिलेले हे दक्षिण आशियातील एकमेव स्मारक आहे. हे स्मारक १५ ऑगस्ट १९९८ मध्ये देशाला अर्पण करण्यात आले. कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या ‘मीग २३ बीएन’ हे विमान येथे ठेवण्यात आले आहे. पुणे कॅंटोन्मेंट बोर्डातर्फे या युद्ध स्मारकाच्या सुशोभीकरणास प्राधान्य देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com