वसतिगृह प्रवेशासाठी वृद्धांना नियम? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा वसतिगृहात मृत्यू झाल्यानंतर वसतिगृहात प्रवेशासाठी वयोमान किती असावे, वृद्धांना वसतिगृहात प्रवेश द्यावा का, याचे नियम करण्याचा विचार विद्यापीठ प्रशासनाने सुरू केला आहे. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा वसतिगृहात मृत्यू झाल्यानंतर वसतिगृहात प्रवेशासाठी वयोमान किती असावे, वृद्धांना वसतिगृहात प्रवेश द्यावा का, याचे नियम करण्याचा विचार विद्यापीठ प्रशासनाने सुरू केला आहे. 

सांगली जिल्ह्यातील बाहुबली पाटील हे 76 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक विद्यापीठात पीएच. डी. करीत होते. त्यांना विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश देण्यात आला  होता. मंगळवारी त्यांचा वसतिगृहात मृत्यू झाला. त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्‍याने झाल्याचे सांगितले जात असले, तरी विद्यापीठाने अधिकृतपणे तसे  जाहीर केलेले नाही. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. 

पीएच.डी. वा अन्य शिक्षण घेण्यासाठी वयाची अट नसली तरी वृद्धापकाळात जडलेल्या आजारांचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांना वसतिगृहात प्रवेश द्यायचा का, याबाबत विद्यापीठ प्रशासनाची चर्चा सुरू झाली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर या घटनेविषयी "सकाळ'शी बोलताना म्हणाले, ""पाटील हे जैन धर्मविषयक पीएच.डी.चे शिक्षण घेत होते. त्यांच्या पत्नीचे आधीच निधन झालेले आहे. वसतिगृहात ते राहात असले, तरी विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. मंगळवारी अचानक त्रास होऊन त्यांचे वसतिगृहातच निधन झाले.'' 

""वसतिगृहात प्रवेश देताना विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते; परंतु वृद्धापकाळात आजाराचे स्वरूप गंभीर होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अभ्यासक्रमांना प्रवेश दिले, तरी त्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी द्यायची का, याचा विचार करावा लागणार आहे. एका वृद्धाचा वसतिगृहात झालेला मृत्यू पाहता, वसतिगृहात प्रवेशासाठी वयोमान निश्‍चित करण्याची गरज निर्माण झाली आहे,'' असे डॉ. करमळकर यांनी सांगितले. 

पाटील यांचा मृतदेह रुग्णालयात हलविण्यासाठी 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली; परंतु त्यासाठी त्यांचे पूर्ण नाव आवश्‍यक होते. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीस ते माहीत नसल्याने रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.

विद्यापीठाच्या वाहनातून त्यांचा मृतदेह हलविण्यात आला, असे डॉ. करमळकर म्हणाले. 

वाहनांचे "आउटसोर्सिंग' बंद 
विद्यापीठात रुग्णवाहिका का नाही, या प्रश्‍नावर डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ""विद्यापीठातील सर्वच वाहनांची तांत्रिक अवस्था बिकट आहे. त्यामुळे वाहनांची गरज आहेच. चालकांची पुरेशी संख्या लक्षात घेता विविध प्रकारची साधारण पंधरा वाहने घेण्याचा विचार आहे. त्यात रुग्णवाहिकादेखील असेल. विद्यापीठाच्या कामांसाठी बाहेरील एजन्सीकडून वाहनांचे आउटसोर्सिंग करणे आता बंद केले जाणार आहे.''