आणखी किती बळी?

उमेश शेळके
मंगळवार, 4 जुलै 2017

पुणे - रखडलेले रुंदीकरण, रस्त्यावरच झालेले अतिक्रमण, टॅंकर-डंपर यांची बेफाम वाहतूक आणि त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नगर रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. लोणीकंद येथे रविवारी (ता. २) झालेल्या अपघातावरून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर तरी राज्य सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार का, रखडलेल्या रुंदीकरणाचे काम मार्गी लावणार का, असा संतप्त सवाल तेथील रहिवाशांकडून केला जात आहे.

पुणे - रखडलेले रुंदीकरण, रस्त्यावरच झालेले अतिक्रमण, टॅंकर-डंपर यांची बेफाम वाहतूक आणि त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नगर रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. लोणीकंद येथे रविवारी (ता. २) झालेल्या अपघातावरून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर तरी राज्य सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार का, रखडलेल्या रुंदीकरणाचे काम मार्गी लावणार का, असा संतप्त सवाल तेथील रहिवाशांकडून केला जात आहे.

लोणीकंद येथील वेकफिल्ड कंपनीसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या एका टॅंकरचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या पलीकडून येणाऱ्या एका टेंपो ट्रॅव्हलर आणि कारला जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये सात जण मरण पावले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज या भागास प्रत्यक्ष भेट देऊन ‘सकाळ’ प्रतिनिधींनी पाहणी केली. तेव्हा ही माहिती समोर आली.

पुणे शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांपैकी हा एक रस्ता आहे. खराडी आणि वाघोली परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढली आहे. तसेच वाघोली, बावडी आणि लोणीकंद या परिसरात मोठ्या प्रमाणावर दगड खाणी आहेत. बांधकामांसाठी पाणी आणि दगड खाणींमुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक (टॅंकर आणि डंपर) होते. तसेच या खराडी आयटी पार्क, तसेच नगर रस्ता आणि सोलापूर रस्त्याच्या मधील भागात मोठ्या प्रमाणावर उभ्या राहत असलेल्या टाऊनशिपमुळे वाहनांची वाढती संख्या यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे तोडलेले रस्ता दुभाजक आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाणही या रस्त्यावर वाढले आहे. 

रस्ता साठ मीटर करण्याचे नियोजन 
सध्या हा रस्ता ३५ मीटर रुंद आहे. तो साठ मीटर रुंदीचा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. मात्र तो अद्याप मिळालेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सर्वेक्षणाचे आणि प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. संथ गतीने सुरू असलेले या कामामुळे आणखी किती जणांचा बळी जाणार, असा सवाल या परिसरातील नागरिक विचारत आहेत. 

सहापदरी करण्याचा प्रस्ताव
सहा महिन्यांपूर्वीच या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे चारपदरी असणारा हा रस्ता सहापदरी करण्यास मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी सहाशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्त्याचे रुंदीकरण, वाघोली, लोणीकंद आणि कोरेगाव भीमा या ठिकाणी तीन उड्डाण पूल, तसेच भुयारी मार्ग उभारण्याची योजना आहे. त्यासाठी प्रत्यक्षात एक हजार कोटी रुपये खर्च आहे. त्यास राज्य सरकारनेही मान्यता दिली आहे. मात्र अद्याप ही योजना कागदावरच आहे.

पीएमआरडीएकडून विकास 
पुणे जिल्ह्याचा गतीने विकास करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने पीएमआरडीएची स्थापना केली. वाघोली हे पीएमआरडीएच्या हद्दीत येते. वाघोली गावाच्या मागील बाजूस प्रादेशिक विकास आराखड्यात आठ किलोमीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यांचे भूसंपादन झालेले नाही. हा रस्ता अस्तित्वात आल्यास वाघोली गाव आणि परिसरातील वाहनांसाठी पर्यायी रस्ता तयार होऊन मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो. हा रस्ता विकसित करण्याची तयारी पीएमआरडीएने दर्शविली आहे. प्रत्यक्षात मात्र पीएमआरडीएकडून कोणतीही हालचाल झालेली नाही.

कोंडी फोडण्याचे आश्‍वासनच 
सोलापूर फाटा ते शिक्रापूरदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नावर रांजणगाव एमआयडीसीमधील कंपन्यांच्या संघटनेने देखील आवाज उठविला होता. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कंपनीच्या कामासाठी त्या ठिकाणी आले असताना संघटनेने त्यांची भेट घेऊन या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. त्या वेळी ही कोंडी फोडण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही सरकारकडून झाली नाही.

पार्किंगची सोय व्हावी 
पाचवा मैल ते केसनंदपर्यंत नगर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जवळपास शंभरहून अधिक मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या शिवाय छोट्या गृहप्रकल्पांचे कामही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, तसेच टाऊनशिपही येऊ घातल्या आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या या भागात वाढत आहे. तसेच विविध कंपन्यांची गोदामे, साड्या आणि गाड्यांचे शोरूम, हॉटेल असल्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी असते. या सर्व गाड्या रस्त्यावरच पार्क होत असल्याने त्यांच्या पार्किंगवर नियंत्रण आणण्याची गरज आहे.

धोकादायक ठिकाणे
येरवडा येथील गुंजन थिएटर चौक
कल्याणीनगर चौक (शास्त्रीनगर चौक)
पाचवा मैल चौक
साई सत्यम पार्क बेकायदेशीरपणे फोडलेल्या रस्ता दुभाजकामुळे
चोखीदाणी ढाबा- बेकायदेशीरपणे फोडलेल्या रस्ता दुभाजकामुळे
वाघेश्‍वर चौक
शिवाजी चौक
ओव्हाळवाडी फाटा (मांजरीकडे जाणारा रस्ता)

तातडीने करावयाच्या उपाययोजना
पुरेशा वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे
बेकायदेशीरपणे पडलेले रस्ता दुभाजक बंद करणे
रस्ता दुभाजकांची उंची वाढविणे
रस्त्यावरील अतिक्रमणे आणि पार्किंग बंद करणे 
वाघोली येथील आठवडी बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे 
प्रादेशिक विकास आराखड्यातील पर्यायी रस्ता तातडीने विकसित करणे
टॅंकर आणि डंपर वाहतुकीवर नियंत्रण आणणे
टॅंकर आणि डंपर यांचे दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करणे
मुदत संपलेल्या, बेकायदेशीर दगडखाणी बंद करणे 

नो एंट्रीत जाणाऱ्या वाहनांवर नियंत्रण हवे 
नगर रस्त्यावरील वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा या ठिकाणी हा रस्ता अरुंद होतो. त्या ठिकाणी आठवडी बाजार आणि अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. पाण्याचे टॅंकर, दगड खाणीतून येणारे डंपर आणि रांजणगाव येथील एमआयडीसीला जाणारे मोठे ट्रेलर यांची मोठी वाहतूक या मार्गावर असल्यामुळे त्याने या कोंडीत आणखी भर पडते. रस्त्याच्या कडेला कुठेही उभे राहणे, नो एंट्रीतून येणे, वाहन भरधाव चालविणे असे अनेक प्रकार या रस्त्यावर पाहावयास मिळाले. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.