धोकादायक चौकांत तातडीने उपाययोजना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

शहरात वारंवार होणाऱ्या अपघाती स्थळांची (ब्लॅक स्पॉट) ‘सकाळ’ने पाहणी केली आणि वृत्तमालिकेतून नेमकी कारणे आणि उपाययोजना मांडण्यात आल्या. याबाबत ‘सकाळ’ कार्यालयात  महापालिका, वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आणि अभ्यासकांची बैठक बोलावली. यात एकत्रित पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरात वारंवार होणाऱ्या अपघाती स्थळांची (ब्लॅक स्पॉट) ‘सकाळ’ने पाहणी केली आणि वृत्तमालिकेतून नेमकी कारणे आणि उपाययोजना मांडण्यात आल्या. याबाबत ‘सकाळ’ कार्यालयात  महापालिका, वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आणि अभ्यासकांची बैठक बोलावली. यात एकत्रित पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील धोकादायक ३६ चौक आणि रस्त्यांची सुधारणा कशी करता येईल, याची संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिस, महापालिकेचे अधिकारी आणि तज्ज्ञ संस्थांच्या प्रतिनिधींनी ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत केला. ही पाहणी पूर्ण होताच, कालबद्ध कार्यक्रम आखून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. या मोहिमेला पुढील महिन्यात सुरवात होणार आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चौकांच्या सुधारणेचा तांत्रिक आराखडाही तयार करवून घेण्याचे या वेळी ठरविण्यात आले.

शहराच्या विविध भागांतील रस्ते आणि चौकांमध्ये सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी शेकडो नागरिकांचा बळी जात आहे. या मुद्यांवर ‘सकाळ’ने ‘ब्लॅक स्पॉट’ या वृत्तमालिकेद्वारे प्रकाश टाकला. महापालिका, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलिस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी, महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत, वाहतूक पोलिस निरीक्षक (नियोजन) विवेकानंद वाखारे, पेडेस्ट्रीयन फर्स्टचे प्रशांत इनामदार, तज्ज्ञ डॉ. रविराज सोराटे, डॉ. अविनाश खरात, डॉ. राहूल कराळे, डॉ. गोपाळ आलापुरे, विनोद सागर आदी या वेळी उपस्थित होते.

सुरक्षित वाहतुकीसाठी पावले गरजेची
पोलिस उपायुक्‍त शेषराव सूर्यवंशी म्हणाले, ‘स्मार्ट सिटी’चा विचार करताना आपण आठवडे बाजारातच अडकलो आहोत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेने शहरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न अद्याप सोडवलेला नाही. वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी, यासाठी महापालिकेने उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उभाराव्यात.

वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट आणि सिटबेल्ट तांत्रिक पद्धतीने अनिवार्य होईल, असे संशोधन विकसित करून ते सक्तीचे करण्यात यावे.  
    वाहतूक शाखेत तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या (ट्रॅफिक इंजिनिअर) अभियंत्यांची नेमणूक करावी.
    वाहतूक पोलिस आणि महापालिकेने संयुक्त मोहीम राबवून पदपथ मोकळे करावेत. 
    आरटीओ कार्यालयाने बेवारस गाड्या स्क्रॅप अथवा लिलावात विकाव्यात.
    ट्रॅफिक रेग्युलेशन हा विषय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात शिकविण्यात यावा.
    वाहनचालकांनी शिस्त पाळलीच पाहिजे. 

नव्या रस्त्यांची बांधणी; रुंदीकरणही सुरू
राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘शहरात वाहनांची संख्या वाढते आहे, पण वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नव्या रस्त्यांची बांधणी करीत आहोत. रस्ते रुंद करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. वाहनचालक, पादचाऱ्यांना सेवा-सुविधा पुरविण्याच्या योजनांमध्ये संबंधित यंत्रणा एकत्र आणून नियोजन केले आहे. पुरेशी पार्किंग व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. रस्त्यांवर खड्डे पडू नयेत, याकरिता सुमारे पाचशे किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले आहेत. 
 

महापालिका आणि वाहतूक शाखा एकत्रित प्रयत्न करणार.
झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे, सूचना फलक लावण्याचे काम सुरू.
गतिरोधक बसविण्याबाबतचा निर्णय समितीकडूनच; अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार अंमलबजावणी.
पार्किंग आणि हॉकर पॉलिसीबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेसमोर. 
रोड सेफ्टी ऑडिटचे काम सुरू; दोन महिन्यांत उपाययोजना सुचविणार.
- विकासकामे सुरू असताना नागरिकांनी थोडा वेळ द्यावा.

तक्रार, सूचनांसाठी हवा कक्ष 
प्रशांत इनामदार ः दर्शक तत्त्वानुसार पादचारी आणि पार्किंगच्या धोरणांची अंमलबजावणी व्हावी. सखोल संशोधन करून रस्त्यांचे डिझाइन केले पाहिजे. रस्ते पाहणी करून रचनात्मक दोष आणि त्रुटी दूर कराव्यात. नवीन इमारतींच्या बांधकामांना मंजुरी देण्यापूर्वीच पार्किंग आहे की नाही, हे पाहणे आवश्‍यक आहे. अनेक निर्णय चर्चेच्या स्तरावरच राहतात. त्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी. नागरिकांकडून तक्रारी व सूचना मिळवण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात यावा.

खड्ड्यांचा अभ्यास करा
डॉ. रविराज सोरटे ः आयआरसी-साइट डिस्टन मेन्टेनंस करायला हवा. रस्त्यांवरील खड्ड्यांचा अभ्यास अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून करून घेणे शक्‍य आहे. भूगर्भातील पाण्याच्या हालचालींमुळेही अपघात होतात. त्यादृष्टीनेही संशोधन सुरू असून, अपघात टाळण्यासाठी त्याचाही विचार व्हावा.

डॉ. अविनाश खरात - ग्राउंड रेडिएशन्समुळे अपघात होतात. अशी ठिकाणे ठरलेली आहेत. रेडिएशन्स झोनमध्येच पुन्हा-पुन्हा खड्ड्यांची निर्मिती होते. रस्त्यांवरील प्रश्‍न व अडचणी सोडविण्यासही ‘सकाळ’ माध्यमाच्या मदतीने ‘सोल्यूशन कॉम्पिटिशन’ घेण्यात याव्यात. ३६ ब्लॅक स्पॉटवर विद्यार्थी काम करू शकतात. रस्त्यांच्या कोपऱ्यावरील कंपाउंड वॉलची अशी रचना करावी, जेणेकरून समोरून येणारी वाहने चालकांना दिसतील.

अन्य काही उपाययोजना...
- रस्त्यांवरील कामे पूर्णत्वास नेली पाहिजेत.
- दुभाजक उंच असावेत.
- स्थानिक अधिकारी आणि तंत्रज्ञांच्या सहभागातून योजना राबवावी. 
- केवळ चर्चेवर न थांबता सुरू केलेल्या कामात सातत्य असावे.
- सायकल ट्रॅक, बीआरटी, मेट्रोच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय आवश्‍यक.
- पी-वन, पी-टू अंमलबजावणी झाली पाहिजे.
- कारवाई करण्यासाठी क्रेन, टेंपोंची संख्या वाढविण्याची गरज. 

Web Title: pune news Immediate Measures in Dangerous Chowk