पुणे: इन्क्युबेटरच्या स्फोटाने नवजात अर्भकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

दरम्यान या घटनेमुळे बाळाचे आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. "इन्क्‍युबेटरने पेट घेण्याचा प्रकार गंभीर आहे. रुग्णालयाचे डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला असून तो आत्यंतिक वाईट आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी आणि कडक शिक्षा व्हावी.'' अशी प्रतिक्रिया कदम यांच्या कुटुंबीयांनी दिली.

पुणे - डॉक्‍टर व रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इन्क्‍युबेटरने अचानक पेट घेतल्यामुळे झालेल्या स्फोटात भाजलेल्या नवजात अर्भकाचा आज (बुधवार) सकाळी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

अप्पा बळवंत चौकातील वात्सल्य रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला. या प्रकाराबाबत डॉक्‍टरांसह तिघाजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात नवजात अर्भकाचे वडील विजेंद्र विलास कदम (वय 35, रा. शुक्रवार पेठ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार डॉ.गौरव चोपडे या डॉक्‍टरसह अन्य कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम यांच्या पत्नी स्वाती यांना सोमवारी रात्री प्रसूतीवेदना झाल्यामुळे तांबडी जोगेश्‍वरी मंदिरासमोरील वात्सल्य रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. तपासणीनंतर सकाळी प्रसूती करू, असे डॉक्‍टरांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार सकाळी पावणे आठ वाजता स्वाती यांचे सीझर करण्यात आले. त्यानंतर पावणे नऊ वाजता बाळाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास इन्क्‍युबेटरमध्ये ठेवण्यात आले. काही वेळानंतर इन्क्‍युबेटरने अचानक पेट घेतला. त्यावेळी स्वाती यांच्याजवळ असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा करून हा प्रकार तत्काळ डॉक्‍टरांच्या निदर्शनास आणून दिला. डॉक्‍टरांनी अर्भक इन्क्‍युबेटरमधून बाहेर काढले. तत्पूर्वी ते गंभीररीत्या भाजले होते. त्यामुळे डॉक्‍टरांनी तत्काळ दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलविले. मात्र अर्भकाची प्रकृती गंभीर होती. अखेर आज सकाळी या अर्भकाचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी तत्काळ घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. 