देशभक्तिपर गीते, रॅली, एकात्मतेचा जागर

देशभक्तिपर गीते, रॅली, एकात्मतेचा जागर

पुणे - देशभक्तिपर गीतातून हुतात्मा जवानांना केलेला सलाम... विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त केलेले देशप्रेम... रॅलीतून लहान मुलांनी केलेला राष्ट्रीय एकात्मतेचा जागर अन्‌ देशाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या व्यक्तींचा गौरव... अशा चैतन्यपूर्ण वातावरणात शहरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. विविध संस्था-संघटना आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करून भारतमातेला सलाम करण्यात आला. या निमित्ताने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. 

शहर जिल्हा काँग्रेस समितीतर्फे काँग्रेसचे नेते बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, मोहन जोशी आदी उपस्थित होते. शहर काँग्रेस क्रीडा सेलतर्फे सचिन सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. 

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिराबाग येथील कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शहराध्यक्ष आणि खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार ॲड. जयदेव गायकवाड, रवींद्र माळवदकर, नगरसेवक सुभाष जगताप, श्रीकांत पाटील, सुरेश बांदल, शैलेश बडदे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पाषाण शाखेतर्फे ध्वजवंदन करण्यात आले. अनिल शेंडगे, संतोष शेंडगे, योगेश शेंडगे, प्रसाद सोनवणे, अमोल सोनवणे उपस्थित होते.

माजी उपमहापौर आबा बागूल यांनी आयोजित केलेल्या एकात्मता रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल येथून या रॅलीला सुरवात झाली. अमित बागूल, राजू पोळ, गणेश रेणुसे, धनू कांबळे उपस्थित होते. 

‘के. जे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च’चे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना अभियांत्रिकी शिक्षणातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे महानगरपालिकेतर्फे महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  

अष्टप्रधान मित्रमंडळ आणि ताराबाई भिसे व जगन्नाथ कांबळे स्मृती प्रतिष्ठानतर्फे लहान मुलांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक भिसे यांच्या हस्ते खाऊवाटप करण्यात आले तर संजय कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अखिल कुणबी समाज सेवा संघातर्फे अनसूया बने यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले आणि लहान मुलांना खाऊवाटप करण्यात आले. येरवडा येथील अंगणवाडी व रयत संस्थेतर्फे दिनेश ओव्हाळ यांनी खाऊवाटप केले. सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण, भदंत सुदस्सन आणि डॉ. राजेश गच्चे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. योग-आनंद संस्थेतर्फे कामगार पुतळा येथे हुतात्मा जवानांना रवींद्र गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली. बोपोडी येथील मिलिंद मोफत वाचनालय व ग्रंथालय, कृष्णाई महिला मंडळ, प्रियदर्शिनी शिक्षण संस्था, मृत्युंजय मित्र मंडळ आदी संस्थांनीही स्वातंत्र्यदिन साजरा केला.

शाळा-महाविद्यालयात उत्साह
देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण, पथसंचलन, मनोगत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विविध शाळा-महाविद्यालयांत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले तर अन्य काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. गोखलेनगर येथील विठ्ठल गोळे माध्यमिक शाळेत माजी नगरसेविका पद्मजा गोळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. सेठ हिरालाल सराफ प्रशालेत शिक्षकांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. माजी विद्यार्थ्यांनी शालेय साहित्याचे वाटप केले. भारत मराठी विद्यालयात शालेय गणवेशाचे वाटप झाले. मुख्याध्यापक राजीव वाघुलकर, सुवर्णा नरके व राम ठकार उपस्थित होते. अश्‍विनी अरुण देवस्थळे हुजूरपागा पूर्व प्राथमिक इंग्रजी शाळेत शिक्षिका अनिशा कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना स्वातंत्र्यदिनाची माहिती दिली. मुख्याध्यापिका अस्मिता जानराव व नीलिमा वळामे उपस्थित होते. पुणे ग्लोबल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्रभातफेरी काढण्यात आली. यात बालवाडीपासून कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यार्थ्यांना फलकांसह प्रभातफेरी काढली. याद्वारे त्यांनी पुणेकरांना वाहतूक, झाडे वाचवा आणि विज्ञानावर भरोसा ठेवा हा संदेश दिला. अश्‍विनीकुमार चावर पाटील, अमीर चावर पाटील, रुही सय्यद, वीणा भालेकर, राहुल म्हैसाळे, स्वप्नील जोशी उपस्थित होते. 

विद्यार्थी सहायक समितीच्या लजपतराय वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम करणारे किशोर धनकुडे यांच्या हस्ते, सुमित्रा सदन वसतिगृहात ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य; तर डॉ. अच्युत शंकर आपटे वसतिगृहात करिअर मार्गदर्शक डॉ. श्रुती पानसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी समितीचे विश्‍वस्त, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

पीएमपीतील गुणवंतांचा गौरव
पुणे महापालिका परिवहन महामंडळाच्या मुख्य इमारतीमध्ये पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात महामंडळातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. तसेच, दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या पीएमपी कर्मचाऱ्यांच्या मुलांचाही सत्कार करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com