योगसाधना ही धर्मांच्या पलीकडील!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

योग देतो आत्मविश्‍वास!
चीनहून पुण्यात शिकायला आलेली अलिना म्हणाली,  ‘‘व्यायाम आणि निरोगी स्वास्थ्य हे तर योगाचे फायदे आहेतच; पण आपल्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम योगसाधना करते. मी स्वतः तीन वर्षांपासून योग करते. भारताच्या प्रदीर्घ संस्कृतीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. चीनमध्येही सध्या योगाचे प्रस्थ वाढतेय.’’

पुणे - ‘‘मी स्वतः धर्माने मुसलमान आहे; पण मी गेली काही वर्षे नियमित योगसाधना करतेय. आमच्या देशात अनेकजण योग करतात. व्यक्तिशः मला तरी ‘योग’ आणि ‘धर्म’ या दोन्ही गोष्टींचा तसा परस्परसंबंध वाटत नाही. किंबहुना, योगसाधना ही तर धर्मांच्या भींतीपलीकडील आणि एका बिंदूला सर्वांना एकमेकांशी जोडणारी गोष्टच असल्याचे मला अनुभवातून जाणवलेय. आज आपण सगळे म्हणूनच तर एकत्र आलो आहोत ना !... आम्ही अनेक देशांतून आलेलो आणि अनेक धर्मांचे असणारे विद्यार्थी आहोत; पण योगाच्या एका छताखाली आम्ही एकत्र आहोत, यापेक्षा या साधनेचे महत्त्व ते काय वेगळे सांगायला हवेय?...’’

...अफगाणिस्तानची हलिसा ‘बीसीए’ शिकायला पुण्यात आलीय. तिला ‘योग’ ही एक धर्मातीत साधना वाटते. तिचेच आहेत हे स्पष्ट आणि तेवढेच प्रगल्भ शब्द. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुधवारी झालेल्या योग प्रात्यक्षिकांच्या सरावानंतर ‘सकाळ’शी बोलताना सिम्बायोसिस शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या हलिसाने योगसाधनेबद्दलची आपली भावना आणि निरीक्षणे व्यक्त केली. तिच्यासोबतच तिच्या अनेक मित्रमैत्रिणींनीही या वेळी मनमोकळा संवाद साधला.

हलिसा म्हणाली, ‘‘योग हा आपल्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे उत्तम माणूस होण्यासाठी मला तरी आवश्‍यक वाटतो. ती खरं तर एक जीवनपद्धतीच म्हणायला हवी. योग हा ‘बियॉन्ड रिलिजन’ असल्याचे मला भारतात आल्यावरच जाणवले.’’

फ्रान्सहून पुण्यात अर्थशास्त्राची पदवी घेण्यासाठी आलेल्या ओव्हायनने आज पहिल्यांदाच ‘योग’ अनुभवला. मन आणि शरीर ताजे करून जाणारे असे काहीतरी आज मला योगसाधनेतून गवसले, असे तो म्हणाला. त्याच्याच सोबत असणाऱ्या फिलिपचे मतही काहीसे असेच होते.

युगांडाचा हसन म्हणाला, ‘‘माझ्या मते आत्मशोध आणि आत्मशांती अशी दोन वैशिष्ट्ये योगसाधनेची सांगायला हवीत. योगाचा अनुभव स्वतः योगासने करूनच घ्यायला हवा.’’  आजचा अनुभव अतिशय आनंददायी आणि नवे शिकवून जाणारा होता. मी अधूनमधून योगासने करत असतो. पण, सगळ्यांच्या सोबतीने करायला खूप मजा आली असल्याचे महम्मद उमर याने सांगितले.