जुन्नर : अभिलेख कक्ष बंद असल्याने नागरिकांना मनस्ताप

दत्ता म्हसकर
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

याबाबतीत चौकशी केली असता संबधित कर्मचारी हा पुणे जिल्हा जात पडताळणी समितीने पुणे येथे जात पडताळणीच्या कामासाठी मूळ कागदपत्रे घेऊन लेखी आदेशाने बोलावले असल्याने गेले असल्याचे सांगण्यात आले.

जुन्नर : जुन्नर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष आज (बुधवार) कार्यालयीन वेळेत बंद असल्याने विविध गावातून येथे कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. तसेच त्यांना मनस्ताप सोसावा लागला. यात भर म्हणून तहसीलदार व नायब तहसीलदार देखील कार्यालयात नव्हते. यामुळे आता दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न नागरिकांना पडला.

याबाबतीत चौकशी केली असता संबधित कर्मचारी हा पुणे जिल्हा जात पडताळणी समितीने पुणे येथे जात पडताळणीच्या कामासाठी मूळ कागदपत्रे घेऊन लेखी आदेशाने बोलावले असल्याने गेले असल्याचे सांगण्यात आले. तर तहसिलदार व नायब तहसिलदार अनुक्रमे मुंबई व पुणे येथे कार्यालयीन कामासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले.

कर्मचारी या कामासाठी अनेकदा पुणे येथे जात असल्याने हा कक्ष बंद राहत असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ देवाडे यांनी सांगितले. येथे अन्य कर्मचारी काम करतात परंतू ते अशा वेळी कोठे जातात हा प्रश्न निर्माण होतो. नागरिकाचा वेळ व पैसे वाया जातात त्यांना त्याच कामासाठी हेलपाटे मारावे लागतात हे थांबविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे.