विठुनामाचा गजर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पुणे - रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने झळाळून निघालेली मंदिरे... अभिषेकानंतर सुरू झालेला विठूनामाचा अविरत गजर...तर दिवसभर भजन, प्रवचन अन्‌ कीर्तनात तल्लीन झालेले भाविक, अशा भक्तिमय वातावरणात मंगळवारी कार्तिकी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंदिर व्यवस्थापन, स्वयंसेवी संस्था व संघटनांनी भाविकांसाठी खास फराळवाटप केले. 

कार्तिकी एकादशीनिमित्त शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमधील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांना दर्शन घेणे सोपे व्हावे, यासाठी मंदिर व्यवस्थापनाने काळजी घेतली होती. विठ्ठलवाडी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर, औंध येथील विठ्ठल मंदिर, नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिराबरोबरच श्री लिंबराज महाराज देवस्थान, पासोड्या विठोबा, तुळशीबाग विठ्ठल मंदिर, झांजले विठ्ठल मंदिरामध्येही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

मध्यवस्ती व उपनगरांमधील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच विठ्ठलभक्तीवर आधारित गीते सुरू होती. बहुतांश ठिकाणी कोजागरीपासून सुरू झालेली काकड आरती कार्तिकी एकादशीनिमित्तही करण्यात आली. विठ्ठलवाडी येथे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. काही स्वयंसेवी संस्थांतर्फे भाविकांना फराळवाटप करण्यात आले; तर औंध येथील विठ्ठल मंदिर सकाळी सात वाजता भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. याबरोबरच ‘नादवेध जाता पंढरीशी’ हा भक्तिरचनांवर आधारित कार्यक्रमही पार पडला. सदाशिव पेठेतील श्री विठ्ठल मंदिर नवी पेठ मराठा मंडळ ट्रस्टतर्फे बुधवारी (ता. १) सायंकाळी नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात सामुदायिक तुळशी विवाह सोहळा आयोजित केला आहे. त्या निमित्त तुळशीचे आयुर्वेदातील महत्त्व सांगून तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुभाष तोंडे यांनी सांगितले.