अपघातांना निमंत्रण देणारा चक्रव्यूह

अपघातांना निमंत्रण देणारा चक्रव्यूह

पुणे - कात्रज चौकात पीएमपीची चार बसस्थानके, भर चौकात प्रवासी घेणारे सहाआसनी रिक्षाचालक आणि झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे थांबणाऱ्या वाहनचालकांमुळे या चौकात बेशिस्तीने कळस गाठला आहे. कात्रज ते नऱ्हे पूल मार्गावर विरुद्ध दिशेने येणारे वाहनचालक आणि जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडणारे पादचारी दिसून येतात. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या विदारक परिस्थितीमुळे हे चौक आहे की नागरिकांचे बळी घेणारे चक्रव्यूह, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. 

जुन्या पुणे-बंगळूर महामार्गाला छेदणाऱ्या दोन बाह्यवळणावरून म्हणजेच कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडून येणारी वाहने, मुंबईकडून येणारी वाहने, कात्रज-कोंढवा रस्त्याने येणारी अवजड वाहने आणि पुण्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनांमुळे कात्रज चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. या चौकातच पीएमपीची चार बसस्थानके आहेत. वाहतुकीच्या वर्दळीत सहाआसनी रिक्षाचालक प्रवाशांसाठी चक्‍क भर रस्त्यात थांबलेले असतात. कात्रज चौकातून नऱ्हे-आंबेगावच्या दिशेने जाताना महामार्गावर रस्त्यालगत दोन्ही बाजूंना अवजड वाहने थांबलेली असतात; तर दुसऱ्या बाजूला चक्‍क रस्त्यावर जुन्या मोटारींच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. पुढे नऱ्हेच्या दिशेने जाताना सिंहगड महाविद्यालयासमोर विरुद्ध दिशेने वाहने मोठ्या प्रमाणावर येतात. तेथील रहिवाशांना पर्यायी रस्ताच नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. तसेच, पादचारी मार्ग नसल्यामुळे येथील सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. जांभूळवाडी बोगद्यातून मुंबईकडे जाणारा पश्‍चिम बाह्यवळण मार्ग दरीपूल, नवले आणि वडगाव उड्डाण पूल परिसरात धोकादायक ठरत आहे. नऱ्हे पुलाखालील चौकात अतिक्रमण वाढले आहे. वडगाव पुलाजवळ प्रवाशांसाठी बसथांबा नाही. खासगी वाहनचालक रस्त्यावर थांबून प्रवासी घेतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उदासीनतेमुळे सेवा रस्त्यांची रखडलेली कामे जीवघेणी ठरत आहेत.

अपघातांना निमंत्रण देणाऱ्या त्रुटी आणि उपाययोजना
कात्रज चौक : त्रुटी
 जुन्या पुणे-बंगळूर महामार्गाचे रखडलेले रुंदीकरण 
 कात्रज चौकात मध्यभागी उभारलेले बीआरटीचे बसस्थानक, वाहनतळ
 कात्रज भाजी मंडईसमोर फळ-भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण 
 कोंढव्याकडून येणारी वाहतूक उड्डाण पुलावरून थेट चौकात न येता वळसा घालून सिग्नलला उतारावर थांबते.

उपाययोजना
 जुन्या पुणे-बंगळूर महामार्गावरील कात्रज घाटाकडे जाणाऱ्या मार्गाचे महापालिका हद्दीपर्यंत रुंदीकरण आवश्‍यक
 भाजी मंडईसमोरील अतिक्रमण हटविणे गरजेचे 
 गावठाणालगतची अतिक्रमणे हटवून रुंदीकरण करणे आवश्‍यक  
 पीएमपी बसस्थानकांचे स्थलांतर पीएमपीच्या जागेतच होणे आवश्‍यक
 खासगी प्रवासी वाहतुकीच्या वाहनांना चौकातून हटविणे
 कात्रज-कोंढवा मार्गावर ग्रेड सेपरेटर उभारणे आवश्‍यक
 बांधकाम विभाग, महापालिका, वाहतूक पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज

दरी पूल : त्रुटी
 जांभूळवाडी बोगदा ते दरीपुलादरम्यान धोकादायक उतार 
 दरीपुलावर अंधार आणि तेथील तुटलेले ग्रील
 जांभूळवाडीला जाण्यासाठी सेवा रस्ता रखडले  

उपाययोजना
 धोकादायक उतार आणि वळणाच्या मार्गावर वेग नियंत्रण व्यवस्था हवी
 दरीपुलावर पथदिवे आणि ग्रीलची दुरुस्ती आवश्‍यक
 सेवा रस्त्यांची कामे तातडीने होणे अपेक्षित 

नवले उड्डाण पूल : त्रुटी
 दरीपुलाकडून नवले उड्डाण पुलाकडे भरधाव वाहने
 सेवा रस्त्यावरून महामार्गावर जाणाऱ्या वाहनांची बेशिस्त वाहतूक 
 उड्डाण पूल परिसरात दिशादर्शक फलक नसल्यामुळे गोंधळ 
 सेवा रस्त्यांच्या रखडलेल्या रुंदीकरणामुळे उड्डाण पुलाखाली कोंडी  
 वडगाव ते कात्रज सेवा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण
उपाययोजना
 वाहतुकीचा वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना 
 सेवा रस्त्याची कामे पूर्ण करणे गरजेचे 
 वाहनचालकांसाठी दिशादर्शक फलक बसवावेत

वडगाव उड्डाण पूल : त्रुटी
 सिंहगड रस्त्यावरून सेवा रस्त्याने महामार्गावर जाताना बेशिस्त वाहतूक
 सिंहगड रस्ता ते महामार्गाला जोडणाऱ्या सेवा रस्त्याचे रुंदीकरण 
 नवले उड्डाण पूल ते वडगाव पुलादरम्यान प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या वाहनांमुळे अपघात 
उपाययोजना
 प्रवाशांसाठी बसथांबा उभारण्याची गरज
 पुलाजवळ रस्त्यावरच प्रवासी घेणाऱ्या खासगी वाहतूकदारांवर कारवाई 
 नवले पुलावरून आल्यानंतर वडगाव पुलाकडे जाताना वेग नियंत्रणासाठी उपाययोजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com