कात्रज घाट रस्त्याची चाळण; दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडेना

महेंद्र शिंदे
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

खेड-शिवापूर (पुणे) : गेल्या काही महिन्यांपासून कात्रज घाट रस्त्याची खड्डयांमुळे अक्षरक्ष चाळण झाली आहे. घाटातील खड्डयांमुळे प्रवाशांना शारिरीक आजार आणि वाहनांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने या मार्गावरील अनेक प्रवाशांनी जाण्या-येण्याचा मार्ग बदलला आहे. मात्र, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडत नाही.

खेड-शिवापूर (पुणे) : गेल्या काही महिन्यांपासून कात्रज घाट रस्त्याची खड्डयांमुळे अक्षरक्ष चाळण झाली आहे. घाटातील खड्डयांमुळे प्रवाशांना शारिरीक आजार आणि वाहनांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने या मार्गावरील अनेक प्रवाशांनी जाण्या-येण्याचा मार्ग बदलला आहे. मात्र, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडत नाही.

सुमारे सहा महिन्यांपासून कात्रज घाट रस्त्याची खड्डयांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यातच पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसाने संपूर्ण रस्ताच उखडून गेला आहे. शिंदेवाडी हद्दीतील रामदरा ते जुन्या बोगद्यापर्यंत आणि भिलारेवाडी ते गुजरवाडी पर्यंतच्या सुमारे तीन किलोमीटर घाट रस्त्याची अक्षरक्ष चाळण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्यावरुन प्रवास करणे मोठे जिकिरीचे झाले आहे. भिलारेवाडी ते गुजरवाडी या एक किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी सुमारे पाच ते दहा मिनिटे वेळ लागत आहे. त्यातच खड्डयात वाहन आदळल्यामुळे वाहनचालकांना शारीरीक त्रासाबरोबर वाहनांच्या नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्डयातील धूळ मोठ्या प्रमाणात उधळत असल्याने दुचाकीस्वारांची अडचण होत असून अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेला प्रवासी कंटाळले आहेत. अखेर या मार्गावरील अनेक प्रवाशांनी आपला पुण्याला जाण्या-येण्याचा मार्ग बदलला आहे. अनेकजण कात्रज घाटाऐवजी नवीन बोगद्यामार्गे ये-जा करत आहेत.

या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरीक सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार करत आहेत. मात्र, अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडला नाही.  

कात्रज घाट रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या रस्त्याने ये-जा करणे मोठे त्रासदायक झाले आहे. अनेक ठिकाणी तर खड्डयांमुळे रस्ताच नाही अशी परिस्थिती झाली आहे, रस्त्याची ही दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत नाही का? असा सवाल प्रवासी विचारत आहेत.

बांधकाम मंत्र्यांनी कात्रज घाटातून जावे
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरला जाण्यासाठीचा मार्ग कात्रज घाटातून आहे. मात्र, दादा नवीन बोगद्यामार्गे कोल्हापुरला ये-जा करत असल्याने त्यांना कात्रज जुन्या घाटातील रस्त्याविषयी माहिती नसावी. त्यामुळे कोल्हापूरला जाताना दादांची गाडी कात्रज घाटातून गेल्यास या रस्त्याचे खड्डे लवकर दुरुस्त होतील, असे नागरीकांचे म्हणणे आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune news katraj ghat road issue