बास्केटबॉल स्पर्धेत भाग घ्यायचाय... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

कोमलला सुरवातीला चालणेही मुश्‍कील होत होते. चेन्नईतील रुग्णालयात तिच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, ती दररोज तीन किलोमीटर चालते. तिच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री निधीसह अनेक मित्रांनी अर्थसाह्य केले. 
- धीरज, कोमलचे पती 

पुणे -  ""वयाच्या 25 वर्षांपर्यंत मी कधीही रुग्णालयाची पायरी चढले नाही; पण अचानकच मला आजार झाला. डॉक्‍टरांच्या तपासणीत हृदय आणि 

फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करावे लागणार असल्याचे निदान झाले. महाराष्ट्रात चौकशी केली; परंतु समाधान झाले नाही. अखेर चेन्नईला जाऊन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. आता मी माझ्या पायावर चालू शकते, बोलू शकते, ऑलिंपिकमध्येही बास्केटबॉल स्पर्धेत सहभागी होण्याची माझी मनीषा आहे,'' अवघ्या 26 वर्षांची कोमल गोडसे सांगत होती. 

सातारा येथील यशोदा टेक्‍निकल कॅम्पस येथे कोमल आणि तिचे पती धीरज दोघेही प्राध्यापक आहेत. सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअर असलेले 

हे दांपत्य; परंतु सप्टेंबर 2016 मध्ये कोमलला श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. तिची भूकही मंदावली. 14 किलो वजनही घटले. "सायनोसिस' आजाराची तीव्र लक्षणे तिच्यामध्ये दिसू लागली. मार्च 2017 पासून तिला कृत्रिम प्राणवायू (ऑक्‍सिजन) देण्यात येत होता. तिच्या उपचारासाठी धीरजने पुणे, मुंबई, बंगळूर येथे दौरेही केले. अखेर त्या दोघांनी चेन्नईला जायचे ठरविले. तेथे "ग्लेनीगल्स ग्लोबल हेल्थ सिटी' या रुग्णालयात कोमल उपचारासाठी दाखल झाली. कोमलच्या प्रायमरी पल्मनरी हायपरटेन्शनच्या आजारामुळे तिचे हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा निर्णय तेथील डॉ. संदीप अट्टावार व डॉ. रवीकुमार यांनी घेतला. कोमलवर यशस्वी प्रत्यारोपण झाल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ब्युटी कॉन्टेस्ट स्पर्धा जिंकलेल्या कोमलची इच्छाशक्ती प्रबळ आहे. धीरजनेही तिला मोलाची साथ दिली. 

दक्षिण आशियात अशा पद्धतीची शस्त्रक्रिया करणे हे एक आव्हानच आहे. मोजक्‍याच रुग्णालयांत या शस्त्रक्रियेची सुविधा आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्लाही घेतला. आता ती सामान्यांप्रमाणेच हालचाल करू शकते.'' 
- डॉ. संदीप अट्टावार, कोमलवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर 

एखाद्या रुग्णाचा जीव वाचविणे हेदेखील आव्हान डॉक्‍टरांसमोर असते. प्रायमरी पल्मनरी हायपरटेंशनसाठी हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण ही उपचारपद्धती आहे. कोमलची इच्छाशक्ती प्रबळ होती. त्यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुलभ झाली. 
- डॉ. रवीकुमार, कोमलवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर