कोंढव्यात रिक्षा अपघातात 12 वर्षीय मुलगी ठार; 7 जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

शिवनेरीनगरकडून कोंढवा गावठाणकडे जाताना रस्त्याच्या उताराने रिक्षावरील ताबा सुटल्याने न्यू डाॅन शाळेजवळील घराच्या भिंतीला रिक्षा आदळली.

कोंढवा : शाळेत प्रवेश घेण्यासाठी निघालेल्या मुलीचा रिक्षा भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला असून, सातजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोंढवा खुर्द येथील वेताळ चौकात घडली. जखमींवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत.

सानिया तौफिक अत्तार (वय 12) असे अपघातात मृत मुलीचे नाव आहे. रिक्षाचालक शेरखान जमीर खान पठाण (वय 45), पत्नी तरन्नू शेरखान पठाण (वय 40), मुलगी आलशिया शेरखान पठाण (वय 14), स्वालिया शेरखान पठाण (वय13), मुलगा तौफीक शेरखान पठाण (वय 10), तौसिम तौफीक अत्तार (वय 40), शोयब तौफीक अत्तार (वय 5 सर्व रा. शिवनेरीनगर गल्ली, नं.12) अशी जखमींची नावे आहेत. 

आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालक शेरखान पठाण पत्नी, मेहुणी व मुलांसह रिक्षा (एम.एच. 12 EF 4502) मधून लष्कर येथील शाळेत प्रवेश घेण्यासाठी निघाले होते. शिवनेरीनगरकडून कोंढवा गावठाणकडे जाताना रस्त्याच्या उताराने रिक्षावरील ताबा सुटल्याने न्यू डाॅन शाळेजवळील घराच्या भिंतीला रिक्षा आदळली. त्यात सानिया हिचा जागीच मृत्यू झाला. त्या सुमारास जखमींना वेताळ मित्र मंडळाच्या कार्यकर्ते व माजी नगरसेवक भरत चौधरी यांनी तत्काळ रुग्णवाहिकेमधून ससून रुग्णालयात दाखल केले.