रुग्णवाहिकाच झाली प्रसूतिगृह! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

प्रसंगावधान राखून डॉक्‍टरांनी रुग्णवाहिकेलाच प्रसूतिगृह बनविले आणि या महिलेची प्रसूती झाली. बाळ, बाळंतीण सुखरूप आहेत. डॉक्‍टरचे प्रसंगावधान आणि वेळीच मिळालेल्या उपचारामुळे हे शक्‍य झाले

भवानीनगर -  वेळ पहाटे दोनची...शेटफळगढेतील वीटभट्टीवरील मजूर गर्भवतीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. वीटभट्टीमालकाने 108 क्रमांकावर फोन केला. भिगवणमधून 108 रुग्णवाहिका आली. महिलेला घेऊन रुग्णवाहिका बारामतीकडे निघाली. वाटेत डॉक्‍टरांनी परिचारिकेलाही सोबत घेतले. मात्र, प्रसंगावधान राखून डॉक्‍टरांनी रुग्णवाहिकेलाच प्रसूतिगृह बनविले आणि या महिलेची प्रसूती झाली. बाळ, बाळंतीण सुखरूप आहेत. डॉक्‍टरचे प्रसंगावधान आणि वेळीच मिळालेल्या उपचारामुळे हे शक्‍य झाले. 

शेटफळगढे येथील कुंभार यांच्या वीटभट्टीवर मंगल सोनवणे कुटुंबीयांसह काम करते. या महिलेला प्रसूतीच्या कळा रात्री उशिरा सुरू झाल्यानंतर वीटभट्टीचालकाने 108 क्रमांकास मोबाईलवरून मदत मागितली. भिगवण येथून डॉ. राजन सोनवणे व पायलट विनोद सोनवणे अगदी काही मिनिटांतच येथे पोचले. तेथून मंगल यांना घेऊन रुग्णवाहिका बारामतीकडे निघाली. तेथून काही अंतरावरच परिचारिका एस. एम. उदावंत या राहतात अशी माहिती मिळाल्याने तेथे काही क्षण थांबून त्यांना रुग्णवाहिकेत घेऊन रुग्णवाहिका बारामतीकडे निघाली. मात्र मंगल यांची स्थिती गंभीर बनत चालल्याने त्यांनी रुग्णवाहिका बाजूला घेऊन रुग्णवाहिकेलाच तात्पुरते प्रसूतिगृह बनवले आणि काही वेळात मंगल यांची सुरक्षित प्रसूती झाली.

सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर रुग्णवाहिका बाळ आणि मंगल यांना घेऊन बारामतीच्या शासकीय महिला रुग्णालयात दाखल झाली. तेथे पुढील उपचारासाठी मंगल यांना दाखल करण्यात आले. वैद्यकीय मदत वेळेवर मिळाली, तर त्याचा रुग्णांना फायदा होऊ शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

टॅग्स