शिवसेनेनं भाजपवर उगारलं लाटणं!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पुणे - गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, दूध, साखर व तेल या जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘लाटणे मोर्चा’ काढला. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

पुणे - गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, दूध, साखर व तेल या जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘लाटणे मोर्चा’ काढला. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

‘महागाई वाढली बुलेट ट्रेनच्या वेगाने, कधी येणार अच्छे दिन, ‘भाजप एक धोका है, देश बचा लो मौका है,’ ‘पेट्रोल भाज्यांनी रडवले रे, अच्छे दिन आणणाऱ्यांनी फसवले,’ ‘एवढी लाटणे कशाला, भाजपला ठोकायला,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. ‘महागाईचा भस्मासुर’ असा नामोल्लेख असलेला वेश शिवसैनिकांनी परिधान केला होता. बैलगाडीवर अन्नधान्य, सिलिंडर आणि तेलाचे डबे घेऊन कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला. या वेळी महिलांनी महागाईवरील पथनाट्य सादर केले. 

या प्रसंगी सेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख उदय सामंत, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, शहराध्यक्ष विनायक निम्हण, सेनेचे महापालिकेतील गटनेते संजय भोसले, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, शहर संघटक श्‍याम देशपांडे, बाबा धुमाळ, दत्ता टेमगिरे, महिला आघाडीच्या तृष्णा विश्वासराव, निर्मला केंडे, कीर्ती फाटक, नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, प्रशांत बधे, संजय मोरे, किरण साळी आदी उपस्थित होते. या वेळी शिष्टमंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. दरम्यान, या मोर्चासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता. मोर्चामुळे साधू वासवानी चौक, विधान भवन चौक येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

युतीच्या गतकाळच्या सरकारमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंवरील दर स्थिर ठेवण्यात आले होते; परंतु भाजपप्रणीत केंद्र सरकार यामध्ये अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. यामुळे सत्तेत जरी असलो, तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेला रस्त्यावर उतरत लागत आहे.
- उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना