लक्ष्मी रस्त्याचा गळा घोटणार

ज्ञानेश सावंत
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे - वाहने आणि पादचाऱ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर पार्किंगच्याच जागेत फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे हा रस्ता आणि पदपथावर अतिक्रमणे वाढतील. तसेच वाहतूक विस्कळित होऊन तिचा बोजवारा ही उडणार आहे. परिणामी, पादचाऱ्यांपाठोपाठ वाहनचालकांचे हाल होणार आहे.

पुणे - वाहने आणि पादचाऱ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर पार्किंगच्याच जागेत फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे हा रस्ता आणि पदपथावर अतिक्रमणे वाढतील. तसेच वाहतूक विस्कळित होऊन तिचा बोजवारा ही उडणार आहे. परिणामी, पादचाऱ्यांपाठोपाठ वाहनचालकांचे हाल होणार आहे.

फेरीवाले, पथारी व्यावसायिकांचे या रस्त्यावरील दुचाकी ‘पार्किंग’च्या जागेत पुनर्वसन करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. या योजनेमुळे पदपथ अतिक्रमणमुक्त होतील; मात्र पथारी व्यावसायिकांकडून रस्त्यावरच बाजार थाटला जाण्याची अशी भीती आहे. प्रायोगिक योजनेत राष्ट्रीय फेरीवाला धोरणामुळे येथील अधिकृत व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानुसार या रस्त्यावरील व्यावसायिकांचे दुचाकींसाठी पार्किंगची सोय असलेल्या जागेत पुनर्वसन केले जाईल. त्याचा आराखडा तयार झाला असून, पुढील आठवडाभरात प्रत्यक्ष कार्यवाहीचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे नियोजन आहे. 

मात्र, ही योजना प्रायोगिक स्वरूपाची असून अतिक्रमणे काढतानाच, पादचाऱ्यांसाठी खरेदीची सोय करण्याचा उद्देश असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. येथील पदपथावर जवळपास शंभर फेरीवाले आणि पथारी व्यावसायिक आहेत. सणासुदीच्या काळात त्यांची संख्या दुप्पट होते. त्यामुळे पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे दिसून आले आहे. अशा व्यावसायिकांवर थातूरमातूर कारवाईही केली जाते. त्यानंतर तास-दीड तासात पदपथावर दुकाने थाटली जातात. येथील काही फेरीवाल्यांची महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे नोंदणी आहे. त्यानुसार त्यांना ओळखपत्रेही दिली आहेत. त्यातच, फेरीवाला धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून, येथील पथारी व्यावसायिकांचे रस्त्यालगत पार्किंगच्या जागेत पुनर्वसन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शंभर व्यावसायिकांना जागा देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. 

जगताप म्हणाले, ‘‘शहरातील प्रमुख रस्त्यावरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे. त्यानुसार येथील पथारी व्यावसायिकांना पार्किंगच्या जागेत दुकाने लावण्याची सोय करून दिली जाईल. त्यामुळे पदपथ मोकळा होईल. पदपथाचा वापर करणाऱ्यांना खरेदी करता येणार आहे. तसेच, व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी रस्त्यालगत ‘रेलिंग’ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांकडील साहित्यही ठराविक जागेत राहील.’’

लक्ष्मी रस्त्यावरील फेरीवाल्यांचे याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची योजना चुकीची आहे. पार्किंगच्या जागेत पथारीवाले आल्यास वाहतूक कोलमडेल. वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होईल. शिवाय, दुकानदार आणि पथारीवाल्यांमध्ये वादाच्या घटना घडतील. पथारीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने स्वतंत्र व्यापारीसंकुल उभे करावे. मुळात, ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही, असे पथारीवाले पदपथावर येतील. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर नियमित कारवाई झाली पाहिजे. अतिक्रमणे काढण्यासाठी हा उपाय योग्य नाही.  
- नितीन अष्टेकर, व्यावसायिक

अशी आहे योजना 
दुचाकी पार्किंगच्या जागेत पुनर्वसन
प्रत्येक परवानाधारक व्यावसायिकाला ४ बाय ५ इतकी जागा
शंभर व्यावसायिकांचे पुनर्वसन
वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी रेलिंग उभारणार