शाकाहारामुळे आयुष्य सुखकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

पुणे - ‘‘माझे गुरू साधू वासवानी हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. जगातील सर्वच चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव त्यांच्यामध्ये आहे. म्हणूनच मला माझे गुरू अतिशय प्रिय आहेत. प्रत्येकाविषयी आदरयुक्त भावना असावी, हीच शिकवण त्यांनी मला दिली. त्यांनी आयुष्यभर प्रेमाचाच संदेश दिला. त्याचेच अनुकरण मी आयुष्यभर केले. शाकाहाराने मन प्रसन्न राहते. त्यांच्या शिकवणुकीद्वारे शाकाहाराचा स्वीकार करणारा मी आजही सुखकर आयुष्य जगतोय.’’ हे उद्‌गार आहेत साधू वासवानी मिशनचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू दादा जे. पी. वासवानी यांचे.

साधू वासवानी यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्ताने जे. पी. यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. ‘‘मी गुरू कुणाचा नाही. शिष्य मात्र सर्वांचा, असे विनम्रतेने म्हणणारे दादा एक स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व. दया, प्रेम आणि करुणेने ओतप्रोत भरलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे हजारो अनुयायी देश-विदेशात आहेत. त्यांच्या विचारांवर साधू वासवानींचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. 

दादा सांगत होते, ‘‘मी एकदा हाँगकाँगला गेलो होतो. तेथे माझे शाकाहार विषयावर व्याख्यान झाले. एक चिनी माणूस मला भेटायला आला. मला म्हणाला आज २५ नोव्हेंबर आहे, मी आजच्या दिवशी मांसाहार टाळतो; पण मी उद्या जगेन का, त्यावर मी त्याला उत्तर दिले. ऐंशीहून अधिक 
वर्षे झाली मी शाकाहार करतोय. तरीही मी अजूनही ठणठणीत आहे. मांसाहार म्हणजे रोगाला आमंत्रण होय. 

त्यापेक्षा शाकाहाराने मन प्रसन्न राहते. माझे गुरू साधू वासवानींनी हेच सांगितले म्हणूनच त्यांचा जन्मदिन आम्ही शाकाहार दिन म्हणून जगभर साजरा करतो.’’ 

गुरूंविषयी दादा म्हणाले, ‘‘गुरूचे स्थान उच्च असते. सामान्य मनुष्य त्याची तुलनाही करू शकत नाही. जेव्हा गुरूचे दर्शन घडते, तेव्हा तुमचे हृदयही प्रेमाने ओतप्रोत भरते. साधू वासवानी सर्वांवर प्रेम करत. प्राणीमात्रावर त्यांचे तितकेच प्रेम होते.’’

आध्यात्मिक सेवेबद्दल दादा म्हणाले, ‘‘लहानपणी मी श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, येशू ख्रिस्त, झरतुस्त्र यांची चित्रे पाहायचो. त्यांच्या विषयीचे वाचन करायचो. कृष्णाचे स्मरण करायचो. परमेश्‍वरच तुमची आई व वडीलही आहे. ही भावना तेव्हापासून मनात रुजली. भगवद्‌गीतेच्या अठराव्या अध्यायात मनुष्य कर्माचे वर्णन आहे. बायबलमध्येही तेच नमूद केले आहे. आपले कर्म सकारात्मक असावे. त्याचे फलित मनुष्याला सकारात्मक 
ऊर्जा देते.’’

‘‘आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर खोटे कधीही बोलू नका. खरे बोला. सत्याची साथ धरा. राजकारणाने देश घडणार नाही, तर शिक्षणाने देश घडेल. प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवा. निवडणुकीत कोणाची तरी हार, तर 
कोणाची तरी जित होते; परंतु जिंकलेल्या पक्षानेही हरलेल्या पक्षाला सोबत घेऊन विकासाची कामे केल्यास देश उंच शिखरावर पोचेल. भारताला हेच हवे आहे. कारण भारत ही आध्यात्मिक भूमी असून, येथे जगभरातून यात्रेकरू येतात. कारण सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसा लाभलेली ही आपली भारत माता आहे,’’ असेही वासवानी यांनी सांगितले.

Web Title: pune news Life succesfully due to vegetarianism