साहित्यकृती निर्माण करताना आत्मभान जागृत हवे - गवाणकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

पुणे - ""साहित्यकृती निर्माण करताना लेखकांमधील आत्मभान जागृत होणे आवश्‍यक आहे. कोणी तरी आपल्या लेखनाला दाद देते, तेव्हा लेखकाला खऱ्या अर्थाने समाधान मिळते. लेखकाने स्वत:शी प्रामाणिक राहून लेखन करायला पाहिजे,'' असे मत लेखिका वीणा गवाणकर यांनी व्यक्त केले. 

पुणे - ""साहित्यकृती निर्माण करताना लेखकांमधील आत्मभान जागृत होणे आवश्‍यक आहे. कोणी तरी आपल्या लेखनाला दाद देते, तेव्हा लेखकाला खऱ्या अर्थाने समाधान मिळते. लेखकाने स्वत:शी प्रामाणिक राहून लेखन करायला पाहिजे,'' असे मत लेखिका वीणा गवाणकर यांनी व्यक्त केले. 

पुणे मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तर सहाव्या वर्धापन दिनानिमित्त लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते कवी संदीप खरे, लेखिका मधुगंधा कुलकर्णी, मंजूषा आमडेकर यांना "साहित्यसम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार' देण्यात आला. ग्रंथालयीन कार्यकर्ता पुरस्काराने नेमिनाथ सातपुते यांना सन्मानित करण्यात आले. संस्कृतपंडित डॉ. म. अ. मेहेंदळे यांना त्यांच्या घरी जाऊन ""साहित्यसम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार' दिला जाणार आहे. कार्यक्रमात ग्रंथालयाचे उपाध्यक्ष सुरेश पळसोदकर, कार्यवाह डॉ. अनुजा कुलकर्णी, कोशाध्यक्ष प्रा. चारुदत्त निमकर, कार्याध्यक्ष धनंजय बर्वे उपस्थित होते. 

गवाणकर म्हणाल्या, ""समृद्ध ग्रंथालय हे त्या शहराचा, गावाचा आत्मा असायला हवा. संस्कृत समाजात ग्रंथालयांना विशेष महत्त्व आहे. आजही विविध विषयांवरील पुस्तकांना वाचक आहेत. ही पुस्तके वाचकांपर्यंत पोचविण्यात ग्रंथालयाची भूमिका महत्त्वाची आहे.'' 

पुरस्काराला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाल्या, ""डिजिटल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात मराठी माध्यमांना आज तग धरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणात अनेक ग्रंथालये शतकोत्तर वाटचाल करत असल्याचे चित्र आशादायक आहे.'' 

""जगण्याच्या वेलीवर नैसर्गिकरीत्या फुलणारे फूल म्हणजे कविता,'' असे सांगत खरे यांनी "मी आणि माझा आवाज' ही कविता सादर केली. प्रास्ताविक बर्वे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. निमकर यांनी केले.