लोहगाव विमानतळावरील पार्किंग शुल्क होणार कमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नवीन कार्गो सुविधेमुळे या वर्षात ४० हजार टन माल वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे.

पुणे : लोहगाव विमानतळावर आकारण्यात येणारे पार्किंग शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळ विकास प्राधिकरणाची येथे बैठक घेण्यात आली. सध्या आर्ध्या तासासाठी ८० रुपये शुल्क होते ते आता ३० रुपये तर एक तासासाठी ५० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी सौरभ राव, विमानतळ संचालक अजयकुमार, डॉ. अनंत देशमुख यांसह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर विमानतळावरील कार्गो सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. नवीन कार्गो सुविधेमुळे या वर्षात ४० हजार टन माल वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे.

विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक २० एकर जागा लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने निश्चित करण्यात येईल. तसेच, उपलब्ध जागेवर स्थानिक व्यावसायिकांना संधी देणे, विमानतळावर वृक्षारोपण, सौर ऊर्जा प्रकल्प, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी श्वानविरोधी स्क्वॉड, नो पार्किंगचे बोर्ड प्रत्येक १०० मीटरवर लावणे, असे महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.