पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी (ता. हवेली) गावाच्या हद्दीमध्ये झालेल्या अपघातात नवनाथ उर्फ ज्ञानु सुरेश जाधव (वय 20) याचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली.

लोणी काळभोर (जि. पुणे) - पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी (ता. हवेली) गावाच्या हद्दीमध्ये झालेल्या अपघातात नवनाथ उर्फ ज्ञानु सुरेश जाधव (वय 20) याचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ जाधव, राहुल शरद वाघमोडे (वय 21) व आकाश प्रकाश जाधव (सर्व रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हे तिघे हडपसर येथे खाजगी कंपनीत कामाला आहेत. शनिवारी (ता. 8) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वरील तिघे आपल्या दुचाकीवरून भरधाव वेगात कामाला निघाले होते. मांजरी गावाच्या हद्दीतील फुरसुंगी फाटा येथे आले असता त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यांच्या दुचाकीचा समोर रस्त्यावर चाललेल्या ट्रॅक्‍टरला पाठीमागून धडक बसली. या अपघातामध्ये नवनाथ जाधव याचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल वाघमोडे याची प्रकृती चिंताजनक आहे. राहुल व आकाश जाधव यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.