ढसाळांसारख्या लढाऊ बाण्याची समाजाला खरी गरज - मल्लिका ढसाळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

पुणे - 'माणूस जातो, परंतु त्याचा विचार जात नाही. म्हणूनच आता हजारो नामदेव ढसाळ तयार झाले पाहिजेत. दलित, महिलांवरील अन्याय, अत्याचार, शेतकरी आत्महत्या, पुरोगामी विचारवंतांचे खून आणि धार्मिक असहिष्णुतेच्या सध्याच्या काळात ढसाळ यांच्या लढाऊ बाण्याची समाजाला खरी गरज आहे. प्रत्येक राज्यात दलित पॅंथर निर्माण केल्यावरच दलितांवर अन्याय करणाऱ्यांना वचक बसेल,'' अशा शब्दांत दलित पॅंथरच्या प्रमुख मल्लिका ढसाळ यांनी रविवारी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

दलित पॅंथरच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, वनविभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक जीतसिंग उपस्थित होते.

ढसाळ म्हणाल्या, 'ढसाळांसारखा प्रचंड व्यासंग असणारा, अरे ला का रे म्हणणारा कार्यकर्ता आत्ता नाही. प्रश्‍न निर्माण करून व्यवस्थेला जाब विचारा. दलित, शोषितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीच हजारो ढसाळांची गरज आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवविण्यास सुरवात करावी.''

कांबळे म्हणाले, 'सरकारी नोकऱ्यांचे आता "आउटसोर्सिंग' झाले आहे. त्यामुळे दलित तरुणांनी पुढारपणा कमी करून कुटुंब, रोजगार व व्यवसायाकडे लक्ष द्यावे. विशेषतः उद्योजक कसे निर्माण होतील, याचा विचार करावा. त्यासाठी राज्य सरकार अनुदान व कर्जाच्या रूपाने तुमच्या पाठीशी आहे.''

टिळक म्हणाल्या, 'वंचित, उपेक्षित व दुर्लक्षित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी ढसाळांनी कायम संघर्ष केला. आजही तेच घटक अनेक प्रश्नांशी झुंजत आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी काम करावे. तीच ढसाळ यांना खरी श्रद्धांजली ठरेल.''

डॉ. धेंडे म्हणाले, 'सामान्य माणसांना दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण असे. प्रत्येकाच्या राजकीय व सामाजिक संघटना वेगळ्या असल्या तरीही प्रत्येकजण आंबेडकरी चळवळीसाठीच काम करतो. दलित पॅंथरसारख्या लढाऊ वृत्तीच्या संघटनांची समाजाला गरज आहे.''