मंगलदास बांदल व बाबूराव पाचर्णे यांच्या वादावर पडला पडदा

नागनाथ शिंगाडे
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

तळेगाव ढमढेरे (पुणे): गेल्या आठवडाभर 'सकाळ' व सरकारनामामध्ये चालू असलेल्या पहिलवान मंगलदास बांदल व आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यातील वादावर आज (शनिवार) एका कार्यक्रमात पडदा पडला असून, आगामी काळात विकास कामांसाठी एकोप्याने काम करण्याचे सुतोवाच आमदार पाचर्णे व पहिलवान बांदल यांनी केले.

तळेगाव ढमढेरे (पुणे): गेल्या आठवडाभर 'सकाळ' व सरकारनामामध्ये चालू असलेल्या पहिलवान मंगलदास बांदल व आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यातील वादावर आज (शनिवार) एका कार्यक्रमात पडदा पडला असून, आगामी काळात विकास कामांसाठी एकोप्याने काम करण्याचे सुतोवाच आमदार पाचर्णे व पहिलवान बांदल यांनी केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे पूलाच्या कामाचे भूमिपूजन आमदार पाचर्णे यांच्या हस्ते व माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या अध्यक्षतेखाली आज झाले. वादामुळे शिरूर तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. येथील कार्यक्रमात हे दोघे काय बोलणार याकडे उपस्थितांचे व तालुक्यातील जानकरांचे लक्ष लागले होते.

यावेळी पहिलवान बांदल भाषण करायला उभे राहिले आणि आमच्या दोघांतील वाद कसा झाला याचे कथन केले. तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही दोघे एकत्र या, चालू असलेली भांडणे बंद करा असे लोक म्हणू लागल्याने या वादावर आता पडदा टाकला आहे. राजकारणात वैर असते. जखमी वाघावर कुत्री चाल करतात, तेव्हा वाघाची शिकार कुत्र्याने करावी इतकी आपली दोस्ती कमजोर नाही. आपले पुत्र राहूल यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाडण्यासाठी कोण दुर्योधन होता हे आपणच ओळखा मी त्यांना पाडले नाही. तर गेल्या निवडणुकीत रांजणगाव जिल्हा परिषद गटातून प्रतिस्पर्धी ताकदवान असूनही राहूलला निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. मी तुम्हाला नेता व राजकीय गुरू मानतो. विकास कामासाठी मी केव्हाही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तालुक्यात भांडणे लावण्याचे काम विरोधी असलेल्या समोरच्या माणसाने केले आहे मी केलेले नाही.मी तुमच्याकडे मदतीसाठी कधीही आलो नाही,घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीत जीवतोडून काम केले मी कसलाही ड्युप्लीकेटपणा केला नाही.राजकारणात संघर्ष होत असतो. आगामी काळात चुकीचा माणूस राजकारणात येणार नाही याची तुम्ही व मी दखल घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील खासगी साखर कारखान्याचा बंदोबस्त करा व सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी संघर्ष करा, घोडगंगा कारखान्याला सभासदांनी ऊस घालून कारखाना वाचवा, अशी विनंती मी आपणास करतो व आगामी काळात आपल्यातील चालू असलेला समज-गैरसमजातील वाद आजच संपुष्टात आला असल्याचे जाहिर करतो, असे बांदल यांनी म्हणताच उपस्थितांनी दाद दिली.

पहिलवान मंगलदास बांदल यांच्या वक्तव्यावर आमदार पाचर्णे म्हणाले की, वाद कोणी कोणाच्या अंगावर ओढून घेतला हेच कळले नाही. आपल्या दोघांमध्ये व्यक्तीगत वाद नाही पहिलवानांनी केलेल्या सुचनांचे राजकारणात पालन करू. आजपासून वादावर पडदा टाकू, पहिलवान बांदल यांनी घोडगंगा वाचविण्याची विनंती केली असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणूकीत  गेल्यावेळी 21-0 ने परभव झाला,आगामी निवडणुकीत 0-21 ने पराभव करू असे सांगून घोडगंगाचा ऊसाचा भाव 3100 रुपये जाहीर करावा असे आवाहन पाचर्णे यांनी यावेळी केले. बांदल यांच्या वक्तव्यावर जास्त भाष्य न करता मोजके बोलून आपला वाद संपला असून या वादावर पडदा टाकला असल्याचे श्री पाचर्णे यांनी जाहीर केले.विकास कामांसाठी एकोप्याने काम करण्याचे आश्वासन यावेळी दोघांनीही दिले. यावेळी घोडगंगा कारखान्यावर भाष्य केल्याने अखेर दोघांतील वाद माजी आमदार अशोक पवार यांच्याभोवतीच असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासठी तळेगाव ढमढेरेसह तालुक्यातील विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याची विनंती श्री बांदल यांनी पाचर्णे यांना केली.

बांदल व पाचर्णे यांचा वाद अखेर तळेगाव ढमढेरे येथील कार्यक्रमात मिटला असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये होती.

Web Title: pune news mangaldas bandal and mla baburao pacharne news