विद्यार्थ्यांनी जाणले कामगारांचे जीवन

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

हडपसर - सासवड रोड वरील वडकीनाला - उरुळी देवाची साडी मार्केट आणि मगरपट्टा चौक अशा तीन ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेळी दुकाने, हॉटेल, वर्कशॉप मध्ये जाऊन मिळेल ते काम केले. 

मांजरी : वडकी येथील ISMR महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध ठिकाणच्या दुकानांमध्ये काम करून तेथील कामगारांचे जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर स्वतः केलेल्या कामातून मिळालेला मोबदला अनाथ आश्रमास देण्याचे ठरवून या विद्यार्थ्यांनी आपल्यातील  सामाजिक जाणीवही स्पष्ट केली.

"कमवा आणि शिका" योजने अंतर्गत इंटरनॅशनल स्कुल ऑफ मॅनजेमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. वडकी येथील श्री विघ्नेश्वरा एज्युकेशन सोसायटी संचलित,इंटरनॅशनल स्कुल ऑफ मॅनजेमेंट अँड रिसर्च या व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील पीजीडीएम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी " कमवा आणि शिका " हि योजना अभिनव पद्धतीने राबविली. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात ३ संघात मिळून २० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. हडपसर - सासवड रोड वरील वडकीनाला - उरुळी देवाची साडी मार्केट आणि मगरपट्टा चौक अशा तीन ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेळी दुकाने, हॉटेल, वर्कशॉप मध्ये जाऊन मिळेल ते काम केले. 

पैसे कमविण्यासाठी प्रत्येक लोकेशन वर मुलांना ४५  मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्यामध्ये मुलांनी झाडू काढणे,भेळ विकणे, वर्कशॉप मध्ये जाऊन काम करणे, साडयांच्या दुकानात जाऊन साडी विकणे अशी मिळेल ती विविध कामे केली. 
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना काम करत शिक्षण घेणाऱ्या व आर्थिक दृष्टया दुर्बल विदयार्थ्यांची कैफियत समजून घेता आली. पैसे कमविण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि मिळालेल्या पैशाचा वापर कसा करावा या गोष्टी या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना समजल्या. या उपक्रमाची सांगता मगरपट्टा येथील सीझन माॅल येथे झाली. या कामातून दिवसभरात कमाविलेले पैसे विद्यार्थ्यांनी अनाथ आश्रमात मदत म्हणून देण्याचे ठरविले. 

"आर्थिक परिस्थिती अभावी अनेक गरीब विद्यर्थ्यांना काम करीत शिक्षण घ्यावे लागते,  त्यामुळे  त्या विद्यार्थ्यांची परिस्तिथी  महाविद्यालयातील मुलांना कळावी, हा हेतू ठेवून अशा उपक्रमाचे आम्ही आयोजन केले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना वाढीस लागण्यास मदत होईल." असा विश्वास श्री विघ्नेश्वरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष जयकिशन भुतडा यांनी व्यक्त केला. 
हा उपक्रम महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. मंजू पुनिया चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :