मराठी चित्रपटांचा दुर्मिळ ठेवा होणार जतन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

चित्रपट संग्रहालयात १९४० ते ५० दरम्यानच्या एक हजार छायाचित्रांची भर

पुणे  - ‘शारदा’, ‘यीन मीन साडेतीन’, ‘नरवीर तानाजी’, ‘जागा भाड्याने देणे आहे’, ‘वर पाहिजे’ अशा एकेकाळी गाजलेल्या वेगवेगळ्या मराठी चित्रपटांची चित्रीकरणादरम्यानची छायाचित्रे पाहायला मिळाली, तर तो आनंदाचाच क्षण ठरेल. हा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जतन करण्यासाठी आला आहे. तो वेगवेगळ्या माध्यमातून रसिकांसमोर खुला होणार आहे.

चित्रपटसृष्टीत ‘जॉनी’ या नावाने ओळखले जाणारे दिवंगत छायाचित्रकार सदानंद आजरेकर यांनी १९४० ते ५० दरम्यान काढलेली वेगवेगळ्या चित्रपटांची छायाचित्रे आजरेकर यांच्या कन्या शांभवी बाळ यांनी संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी मंगळवारी दिली. या छायाचित्रात राजा परांजपे, सुलोचनादीदी, इंदिरा चिटणीस, बेबी शंकुतला, कुसुम देशपांडे, राजा गोसावी अशा जुन्या पिढीतील कलावंतांचा समावेश आहे.

संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ‘‘जुन्या काळातील जवळपास एक हजार छायाचित्र संग्रहालयाकडे आली आहेत. यामुळे संग्रहालयाच्या वैभवात आणखीनच भर पडली आहे. ही छायाचित्र जतन करण्यासाठी संग्रहालयाकडे पुरेशी जागा आणि अद्ययावत तंत्रज्ञान आहे. अशी छायाचित्रे किंवा चित्रपटांचे पोस्टर्स आम्ही प्रदर्शनाच्या आणि ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून वेळोवेळी रसिकांसमोर आणत असतो.’’ 

बाळ म्हणाल्या, ‘‘वडिलांकडे कलात्मक दृष्टी होती. प्रकाशाची उत्तम जाण होती. याच्या मिलाफातून ते छायाचित्र काढत. ही नजर त्यांच्या छायाचित्रात आपल्याला पाहायला मिळते.’’

छायाचित्रकार सदानंद आजरेकर यांच्यासारखे कलावंत हे एका कुटुंबाचे नसतात. ते देशाचेच असतात. त्यामुळे कलावंतांच्या कुटुंबीयांनी किंवा रसिकांनी आपल्याकडील चित्रपटविषयक दुर्मिळ खजिना संग्रहालयात जतन करण्यासाठी द्यावा. यामुळे पुढच्या पिढ्यांना कलात्मक दृष्टी मिळेल आणि आपला इतिहासही समजून घेता येईल. 
- प्रकाश मगदूम, 
संचालक, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय