'आश्‍वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

अनेक शाळांनी शिक्षण शुल्क कमी करण्याचे आश्‍वासन देऊनही प्रत्यक्षात मात्र शुल्क जैसे थेच आहे. या शाळा पालकांचे लाखो रुपये लाटत आहेत.

पुणे : जादा शिक्षण शुल्क आकारणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई करून शाळांनी उकळलेले अतिरिक्त शुल्क हे पालकांना परत देण्यात येईल, तसेच शाळांची शुल्कवाढ रद्द करण्यात येईल, अशी आश्‍वासने देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्यक्षात मात्र एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे, येत्या तीन दिवसांत ही आश्‍वासने पूर्ण झाली नाहीत, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पेठकर एज्युकेशन ट्रस्टच्या प्राजक्ता पेठकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. 

परिषदेत काही पालकांचीही उपस्थिती होती. पेठकर म्हणाल्या, ''अनेक शाळांनी शिक्षण शुल्क कमी करण्याचे आश्‍वासन देऊनही प्रत्यक्षात मात्र शुल्क जैसे थेच आहे. या शाळा पालकांचे लाखो रुपये लाटत आहेत.

तसेच, पुस्तकांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा लावत आहेत. त्यामुळे, मंगळवारपर्यंत (ता. 6) तावडे यांनी आपली या संदर्भातील आश्‍वासने पूर्ण करावीत, अन्यथा तावडे आणि राज्याच्या शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार या दोघांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत.''