फाकटकरांची नापासांची शाळा यंदाही 100 टक्के पास

गणेश बोरुडे
बुधवार, 21 जून 2017

तळेगाव स्टेशन - दहावीपूर्वीच नापास झालेल्या नाउमेद विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेली तळेगाव दाभाडे येथील फाकटकर सरांची नापासांची शाळा यंदाही शंभर टक्के पास झाली आहे. सलग पंधरा वर्षांचा अव्वल निकालाची परंपरा कायम ठेवत,इतर शाळांनी झिडकारलेले 68 नापास विदयार्थी यंदाही चांगल्या मार्कांनी 10 वी पास झाले आहेत.

तळेगाव स्टेशन - दहावीपूर्वीच नापास झालेल्या नाउमेद विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेली तळेगाव दाभाडे येथील फाकटकर सरांची नापासांची शाळा यंदाही शंभर टक्के पास झाली आहे. सलग पंधरा वर्षांचा अव्वल निकालाची परंपरा कायम ठेवत,इतर शाळांनी झिडकारलेले 68 नापास विदयार्थी यंदाही चांगल्या मार्कांनी 10 वी पास झाले आहेत.

गुणवत्तेच्या स्पर्धेपायी खाजगी आणि काही सरकारी शाळांकडून निकाल 100 टक्के लागावा या उद्देशाने केवळ गुणवान विद्यर्थ्यांनाच प्रोत्साहन देण्याचा ट्रेंड आला आहे. यामुळे दहावीला प्रवेश घेताना बिचाऱ्या "ढ" विद्यार्थ्यांना सदैव तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याचे चित्र आढळून येते. शाळांमार्फत आपली पत वाढविण्यासाठी अशा "ढ' विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो अथवा नववीलाच जाणीवपूर्वक नापास करुन शाळेबाहेर काढले जाते. अशा दुर्लक्षित नाउमेद विद्यार्थ्यांसाठी तळेगावात नितीन फाकटकर सरांची शाळा गेल्या 15 वर्षांपासून आशेचा नवा किरण ठरली आहे. या शाळेत नववीला नापास झालेले, शाळेत टार्गटपणा केल्याने बाहेर काढलेले विद्यार्थी आहेत. शिवाय वय उलटल्यानंतरही दहावी पास होऊन पुढील शिक्षणाची इच्छा असलेल्या बाह्य विद्यार्थ्यांचाही या शाळेत समावेश आहे. मराठी इंग्रजी माध्यमांसाठी नियमित वर्ग भरवून त्यांना चांगल्या मार्काने दहावी पास करुन नापासाचा कलंक पुसण्याचे विधायक काम फाकटकर सरांची नापासांची शाळा करते आहे. 17 नंबरचा फॉर्म भरुन बहिस्थ विद्यार्थी म्हणून परिक्षा देणारे 68 विद्यार्थी यावर्षी चांगल्या मार्काने पास झाले आहेत.

बाजारीकरण झालेल्या शैक्षणिक क्षेत्रातील बौद्धिक असमतोल दूर करण्याच्या हेतूने साधारणतः 2000 साली फाकटकर सरांनी नापासांची शाळेची स्थापन केली. तळेगावातीलच सतीश खळदे यांनी आपली इमारत गेल्या पंधरा वर्षांपासून नापासांच्या शाळेसाठी वापरण्यास दिली आहे. अत्यल्प फी, आर्थिक दुर्बलांना मोफत पुस्तके, 15 जणांचा शिक्षकवृंद घेऊन मुख्याध्यापक फाकटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली इतर शाळांप्रमाणेच इथेही सकाळ आणि दुपार सत्रात नियमित वर्ग भरतात. अगदी स्पोर्टस डे, पिकनिक आदी इव्हेंट्‌सही इथे घेतल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थानी असणाऱ्या या शाळेत ज्ञानार्जन करुन पास झालेले अनेक बरेच विद्यार्थी वकील, हॉटेल मॅनेजमेंट आणि तत्सम चांगल्या पगाराच्या नोकरींद्वारे अर्थार्जन करत आदर्श जीवन जगात आहेत. समाजाने झिडकारल्या, दुर्लक्षिल्या गेलेल्या नापास विद्यर्थ्यांना पास करुन जीवनाच्या फाकटकर सरांच्या नापासांच्या शाळेची किर्ती वाढल्याने आता इतर ठिकाणीही अशीच नापासांची शाळा सुरु करण्याचा आग्रह फाकटकर सरांना केला जातो आहे.