कृषी विभाग हा कालबाह्य विभाग: आमदार राहुल कुल

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

क्रीडा संकुलासाठी कृषी खात्याची जागा द्यावी
दौंड शहरातील प्रस्तावित तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. संकुलासाठी दौंड कृषी विभागाची पडीक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राहुल कुल यांनी सभागृहात केली.

दौंड : राज्यातील कृषी विभागाचे अस्तित्व कुठेच दिसत नाही, हा कालबाह्य झालेला विभाग आहे. कोणतेही चांगले मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या या विभागाला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याची मागणी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

विधानसभा अधिवेशनात कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, गृह, शालेय शिक्षण व क्रीडा या विभागांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान ३१ जुलै रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी ही मागणी केली आहे.

कृषी विभागावर बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले, ''ठिबक सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु त्यामध्ये वाढ करून किमान ६० टक्के अनुदान देण्यात यावे, ठिबक सिंचन अनुदान योजनांतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. पूर्वी अनुदान दिले जात होते परंतु २०११- १२ पासून आजपर्यंत वाटप करण्यात आलेले नाही, हे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांना अनुदान वेळेत मिळावे यासाठी शासनाने स्वतंत्र धोरण ठरवावे. कृषी विभागाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्याचा अधिकाधिक फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, पिक स्पर्धा व जिल्हा कृषी महोत्सव सारखे नवनवीन उपक्रम शासनाने हाती घेण्याची आवश्यकता आहे.''

शासनाच्या आरे डेअरीच्या स्टॉलवर इतर खासगी कंपन्यांचे पदार्थांची विक्री केली जात असून आरे डेअरी ने आपले उत्पादन वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यांना उत्पादन वाढविणे शक्य नसल्यास अन्यत्र माल उत्पादित करून घेऊन तो आरे स्टॅालवर विकल्यास शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळू शकतो, अशा आशयाची सूचना त्यांनी चर्चेदरम्यान केली. 

शासनाकडून ज्याप्रमाणे खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेतीला प्रोत्साहन दिले जाते त्याच धर्तीवर गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला देखील प्रोत्साहन देण्यात यावे. सहकारी संस्थांकडे असणारे गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाचे तलाव हे त्याच संस्थाकडे असावेत, अशी मागणी केल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

क्रीडा संकुलासाठी कृषी खात्याची जागा द्यावी
दौंड शहरातील प्रस्तावित तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. संकुलासाठी दौंड कृषी विभागाची पडीक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राहुल कुल यांनी सभागृहात केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :