मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे -  मराठवाड्याच्या विकासाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजसारखी संस्था स्थापन करावी, अशी सूचना माजी परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेचे सदस्य सुधीर देवरे यांनी केली. 

पुणे -  मराठवाड्याच्या विकासाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजसारखी संस्था स्थापन करावी, अशी सूचना माजी परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेचे सदस्य सुधीर देवरे यांनी केली. 

उद्योग, व्यवसाय आणि नोकरीनिमित्त पुण्यात स्थिरावलेल्या मराठवाड्याच्या भूमिपुत्रांचा "मराठवाडा स्नेहबंध' हा मेळावा शनिवारी "यशदा'मध्ये पार पडला. या वेळी विविध स्तरांतील नामवंत मंडळी आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. सुधीर देवरे यांनी मराठवाड्याच्या मागसलेपणाची कारणमीमांसा केली. तेथील लोक पुण्यात येऊन मोठा उद्योग- व्यवसाय उभा करत असतील, तर मराठवाड्याच्या भूमीत सक्षम व्यक्तींची उणीव नाही हेच स्पष्ट होते. मागासलेपणाची अनेक कारणे आहेत, त्यावर खूप चर्चा झाली आहे. त्यामुळे आता कृती करण्याची गरज आहे. मराठवाड्यात उद्योगांसाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे म्हणून सातत्याने पाठपुरावा करणारी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. चेंबर ऑफ कॉमर्ससारखी संस्था हे काम करू शकेल, असे देवरे म्हणाले. पुण्यात स्थिरावलेल्या व्यक्तींनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

या वेळी मंचावर पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते, अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पिंपरी- चिंचवडचे भाजप नेते एकनाथ पवार, मसापचे कार्यकारी अध्यक्ष मिलिंद जोशी, उद्योजक सुभाष नेलगे, सुशील कुलकर्णी यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून अपघात होऊनदेखील प्रयत्नरत राहणारे, सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कचे वरिष्ठ अधिकारी डॉ. रवींद्र तांबोळी यांनी व्हीलचेअरवर बसून प्रास्ताविक केले. "मराठवाडा स्नेहबंध' हे केवळ या कार्यक्रमापुरते नाहीत, तर कायमचे राहण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे; त्यासाठी कृती कार्यक्रम तयार आहे, असे ते म्हणाले. टेक्‍नोप्लास्ट उद्योगाचे प्रमुख सुनील पाठक (औरंगाबाद), सेंच्युरिअन हॉटेलचे मालक बालाजी शिंदे (लातूर), टेक रेलचे प्रमुख, आयटी उद्योजक भूषण कदम, महिलांना रोजगार देणाऱ्या सुनीता गायकवाड (उस्मानाबाद), पोल्ट्री व्यावसायिक डॉ. अजय देशपांडे अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या वीस जणांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन गोपाळ आवटी यांनी केले.