‘मॅट्रिमोनिअल’वर  लग्न जुळवताय?

शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे - लग्न जुळविण्यासाठी इंटरनेटवरील संकेतस्थळांचा वापर करण्यातील धोक्‍यांची चर्चा होऊनदेखील फसवणुकीचे प्रमाण अलीकडे बरेच वाढले आहे. याबाबत सावधानता बाळगली जात नाही. याचाच फायदा उठवत सायबर गुन्हेगारांकडून महिला आणि पुरुषांनाही लाखो रुपयांना गंडा घातल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. 

पुणे - लग्न जुळविण्यासाठी इंटरनेटवरील संकेतस्थळांचा वापर करण्यातील धोक्‍यांची चर्चा होऊनदेखील फसवणुकीचे प्रमाण अलीकडे बरेच वाढले आहे. याबाबत सावधानता बाळगली जात नाही. याचाच फायदा उठवत सायबर गुन्हेगारांकडून महिला आणि पुरुषांनाही लाखो रुपयांना गंडा घातल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. 

पुण्यातील मोनिका (नाव बदलले आहे) नावाच्या तरुणीने विवाहासाठी मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. या संदर्भात किरण नावाच्या व्यक्‍तीने मोनिकाला ई-मेल केला. त्यात त्याने ‘आपल्या प्रोफाइलमध्ये मला इंटरेस्ट आहे. मी अमेरिकेत वास्तव्यास असून, चांगल्या पगाराची नोकरी आहे,’ असे म्हटले होते. मोनिकाने तिला अपेक्षेनुसार प्रोफाइल मिळाल्यामुळे होकार कळविला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक शेअर केले. किरणने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून बोलत असल्याचे भासवून तिच्याशी व्हॉटस्‌ॲपवर चॅटिंग सुरू केले. मोनिकाचा वाढदिवस जवळ आल्यामुळे त्याने तिला महागडे गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी कस्टम विभागाच्या कार्यालयातून महिलेचा फोन आला. ‘तुमच्या नावावर गिफ्ट आले असून, त्याची कस्टम ड्यूटी भरावी लागेल.’ मोनिकाने किरणला फोन करून खातरजमा केली. त्याने तिला पैसे भरण्यास सांगून भारतात परत आल्यानंतर परत देईन, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या कारणाने फोन आल्यानंतर मोनिका बॅंक खात्यात पैसे भरत गेली. अशा प्रकारे मोनिकाने दहा लाख रुपये भरले. मात्र, गिफ्ट न आल्यामुळे तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील दोन नायजेरियन तरुणांनी मॉडेल कॉलनीतील एका ६४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ९४ लाख रुपयांना लुबाडले. सायबर गुन्हे शाखेने ग्रेटर नोएडा येथे जाऊन कॅलेब ओबगाऊगू (वय २७) आणि व्हिक्‍टर शिगोझे (वय २८) या दोघांना नुकतीच अटक केली. 
गुन्हा करण्याची पद्धत : सायबर गुन्हेगार हे मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावर बनावट नाव आणि छायाचित्राच्या मदतीने प्रोफाइल तयार करतात. त्याद्वारे काही महिलांना लग्नाची मागणी घालतात. त्यानंतर ओळख वाढवून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतात व चॅटिंग करून जवळीक साधतात. काही दिवसांनंतर वाढदिवसाच्या निमित्ताने भेटवस्तू पाठवीत आहे, किंवा मी परदेशातून तुला भेटण्यास येत असल्याचे सांगतात. काहीवेळेस छायाचित्र एकमेकांना पाठवून त्याच्यात छेडछाड करून ब्लॅकमेल करतात. अशा आरोपींमध्ये मुख्यतः नायजेरियन नागरिक असतात. त्यांची प्रोफाइलवर दिलेली छायाचित्रे कधीच खरी नसतात. तसेच, ते व्हिडिओ कॉलिंग करत नाहीत. त्यात महिलेची तर कधी पुरुषाचीही फसवणूक होते.

काय करावे आणि काय टाळावे?  
 परदेशात असलेल्या मुलगा किंवा मुलीची माहिती स्वतः किंवा पालकांकडून व्यवस्थित पडताळणी करून घ्यावी
 परदेशातील स्थळांची त्यांच्या भारतातील नातेवाइकांकडून शहानिशा करूनच वैयक्‍तिक माहिती द्यावी
 महागड्या भेटवस्तू आणि बक्षिसाच्या आमिषाला बळी पडू नये
 भेटवस्तू कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगून पैशांची मागणी केली जाते; परंतु कस्टम विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या बॅंक खात्यात पैसे भरण्यास कधीच सांगत नाहीत
 वैयक्‍तिक माहिती आणि छायाचित्रे मागवून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार सुरू आहेत
 अनोळखी व्यक्‍तीला आपली छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करू नयेत

गुन्हा घडल्यावर काय कराल?
 सर्वप्रथम पालकांना विश्‍वासात घ्या
 फसवणूक झाल्यास त्या व्यक्‍तीसोबत संपर्कात राहून त्याला शंका येऊ न देता पोलिस ठाण्यात किंवा सायबर सेलकडे तक्रार करावी. आणखी पैशाची मागणी केल्यास पैसे जमा करू नये
 विविध कारणे सांगून पैशांची मागणी किंवा न दिल्यास धमकावण्याचे प्रकार घडू शकतात. दबावाला बळी पडू नये.
 फसवणूक करणाऱ्या व्यक्‍तीच्या अकाउंटची माहिती, प्रोफाइल आणि यूआरएलचे स्क्रिनशॉट्‌स घ्यावेत. तसेच, रक्‍कम कोणत्या बॅंक खात्यात जमा केली त्याची माहिती सायबर सेलला द्यावी.