आमदार राहुल कुल यांनी कर्जमाफी नाकारली 

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 13 जून 2017

दौंड : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार आमदार राहुल कुल यांनी कर्जमाफी नाकारली आहे. कर्ज फेडण्यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. 

दौंड : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार आमदार राहुल कुल यांनी कर्जमाफी नाकारली आहे. कर्ज फेडण्यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करताना कर्जमाफीसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या उच्चाधिकार मंत्री समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सक्षम शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्यासंबंधी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार कुल यांनी ती नाकारली आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे सहयोगी सदस्य असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे ते आमदार आहेत. 

आमदार कुल यांनी सांगितले, की "कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल पहिल्यांदा मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांचे राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने विशेष आभार मानतो. कर्जमाफीसंबंधी घोषणा करताना चंद्रकांत पाटील यांनी सक्षम शेतकऱ्यांना स्वतःहून कर्जमाफीतून वगळण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी कर्जमाफी नाकारली आहे. सक्षम शेतकरी कर्जमाफी नाकारण्यासाठी पुढे आले तर राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक बोजा काही प्रमाणात कमी होईल. आम्ही चांगल्या प्रकारे शेती करतो आणि यंदा पाण्याची उपलब्धता चांगली आहे. आम्ही नियमित कर्जफेड करत असून, या वर्षी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी सक्षम असल्याने मी कर्जमाफी नाकारत आहे.''