‘मोबाईल टॉयलेट’ची सुविधा द्यावी - शर्मा

‘मोबाईल टॉयलेट’ची सुविधा द्यावी - शर्मा

पुणे - ‘‘कॅंटोन्मेंटमधील अतिक्रमण झालेल्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार वाढले आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डांनी अशा ठिकाणी ‘मोबाईल टॉयलेट’ उपलब्ध करून द्यावेत. तत्पूर्वी नागरिकांमध्ये जनजागृती घडविण्यास प्राधान्य द्यावे. तरच ‘स्वच्छ भारत अभियान’चा हेतू साध्य होईल,’’ असा सल्ला लष्कराच्या मालमत्ता विभागाचे महासंचालक जोजनेश्वर शर्मा यांनी दिला.

खडकी बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नव्याने प्रसूतिगृह बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन शर्मा यांच्या हस्ते झाले. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर धीरज मोहन, उपाध्यक्ष अभय सावंत, आमदार विजय काळे, दक्षिण मुख्यालय मालमत्ता विभागाच्या मुख्य संचालक गीता कश्‍यप, संचालक भास्कर रेड्डी, संजीवकुमार, पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. डी. एन. यादव, खडकीचे ‘सीईओ’ अमोल जगताप, देहूरस्ताचे ‘सीईओ’ अभिजित सानप, नगरसेवक आदित्य माळवे, सदस्य सुरेश कांबळे, कमलेश चासकर, दुर्योधन भापकर, कार्तिकी हिवरकर आदी उपस्थित होते.

शर्मा म्हणाले, ‘‘केंद्र सरकारचा ‘स्वच्छ भारत’ अभियान देशभर राबविला जात असतानाच कॅंटोन्मेंटमधील ३० टक्के नागरी भाग कमालीचा अस्वच्छ आहे. मोबाईल टॉयलेटद्वारे ही अस्वच्छता दूर होईल. त्यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्रालय व अर्थ मंत्रालयाचीही आर्थिक मदत मिळू शकते. राज्य आरोग्य विभागाचा उपयोग कॅंटोन्मेंटलाही व्हावा, असा आदेश केंद्राने राज्य सरकारला दिला आहे. बोर्डांनीही पैसे खर्च करावेत. सरकार निधी देण्यास तयार आहे. रुग्णालयांनी सप्टेंबरपर्यंत अद्ययावत संगणक प्रणाली बसवून घ्यावी.’’ 

काळे म्हणाले, ‘‘कॅंटोन्मेंट बोर्डाला आवश्‍यक निधी आम्ही दिला असून त्यातून विकासकामे मार्गी लागणार आहेत. राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ कॅंटोन्मेंटला मिळण्यास तीन महिन्यात सुरवात होईल.’’ डॉ. रणजित भोसले यांनी आभार मानले.

चांगले कॅंटोन्मेंट निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) कॅंटोन्मेंटला फटका बसणार आहे. त्यादृष्टीने सरकारनेही मदत करावी.
- ब्रिगेडिअर धीरज मोहन, अध्यक्ष, खडकी बोर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com